Monkey Throwing Notes from Tree : सध्याच्या काळात दररोज अनेक वेगवेगळ्या घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. खरं तर काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. आता अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका माकडाने चक्क ८० हजार रुपयांनी भरलेली बॅग हिसकावली आणि झाडावर जाऊन बॅगेतील पैशांचा वर्षाव केल्याचा प्रकार घडला आहे. बॅगेतील पैशांचा वर्षाव केल्यानंतर पैसे जमा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नेमकं घटना काय घडली?

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. बिधूना तहसील कार्यालयात एका माकडाने एका शिक्षिकाची दुचाकीवरून रोख रक्कम भरलेली बॅग घेतली आणि ती बॅग घेऊन माकड झाडावर चढलं. त्यानंतर माकडाने झाडावरून नोटांचा वर्षाव केला. हा सर्व प्रकार जवळपास तासभर सुरू होता. माकडाला पाहण्यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी देखील केली होती. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

झालं असं की, दोडापूर गावातील एका खाजगी शाळेतील शिक्षक हे जमिनीच्या व्यवहारासाठी तहसील कार्यालयात आले होते. त्यांनी त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीत ८०,००० रुपये असलेली एक बॅगे ठेवली. त्यानंतर कायदेशीर कामांची प्रक्रिया करण्यासाठी ते कार्यालयात निघून गेले. मात्र, त्यानंतर त्यांच्या गाडीजवळ अचानक एक माकड आलं आणि माकडाने गाडीची डिक्की उघडवली आणि पैशाची बॅग नेली.

माकडाला वाटलं असेल की त्या बॅगेत काही खाण्यासारखं अन्न मिळेल. मात्र, त्या बॅगेत काहीही खाण्यासारखं अन्न नव्हतं. माकडाने झाडावर जाऊन बॅग उघडवली आणि त्याची निराशा झाली. त्यानंतर माकडाने बॅगेतील पैसे झाडावरून हवेत फेकून दिले. झाडाखाली लोकांनी एकच गर्दी केली होती, माकडाने पैशांचा वर्षाव केल्यानंतर पैसे जमा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

दरम्यान, ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात झाडावरून ५०० रुपयांच्या नोटा खाली पडताना आणि त्याखाली उभे असलेले अनेक शक्य तितके पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, हा सगळा गोंधळ संपेपर्यंत संबंधित शिक्षकाला ८०,००० रुपयाऐवजी ५२ हजारच परत मिळाल्याचं सांगितलं जातंय.