जगातील सगळ्यात धोकादायक रस्ता म्हणून नागमोडी वळणाचा चीलीमधला हा रस्ता प्रसिद्ध आहे. दरवर्षी जगातील दहा लाखांहून अधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होतात. वेगमर्यादा न पाळणे, त्याचप्रमाणे सुरक्षेची खबरदारी न घेतल्याने हे अपघात होतात. पण काही रस्ते असेही आहेत जिथे चालकाचे खरे कसब पणाला लागते. या रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे जणू मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे. जगातील अशा दहा धोकादायक रस्त्यांमध्ये पहिला क्रमांक लागतो तो नागमोडी रचना असलेल्या ‘लॉस काराकोलेस पास’ या रस्त्याचा. अँडीच्या पर्वत रांगेतून नागमोडी वळणाचा रस्ता जातो. अर्जेंटिना आणि चिली या दोन देशांना जोडणारा हा रस्ता आहे. समुद्रसपाटीपासून १० हजार २५१ फूट उंचावर असलेल्या या रस्त्यावरून मुख्यत्त्वे मालवाहतूक केली जाते. सामानाने लादलेले मोठे ट्रक घेऊन या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यू गाठीशी घेऊन फिरण्यासारखेच आहे. एका रस्त्यात जवळपास २० नागमोडी वळणे आहेत तसेच पर्वत रांगेतून हा रस्ता जात असल्याने या ठिकाणी सोसाट्याचा वाराही वाहतो त्यामुळे गाडी चालवणे अवघड होते. या रस्त्यावरुन जाणा-या १० गाड्यांमागे २ अपघात होतात. हिवाळ्यात मात्र हा रस्ता वाहतूकीसाठी बंद केला जातो. या रस्त्यावरून गाडी चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असले तरी अनेक जण थरार अनुभवायला या रस्त्यावरून प्रवास करतात. जगातील सगळ्यात धोकादायक रस्त्याच्या यादीत भारतातील ‘झोगी पास’ या रस्त्याचा देखील समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2016 रोजी प्रकाशित
नागमोडी वळणाचा ‘हा’ रस्ता जगातील सगळ्यात धोकादायक
'या' रस्त्यावरुन प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 28-10-2016 at 15:29 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most dangerous road in the world