विमानप्रवास म्हटला की आपल्याला आठवतात ते चकाचक एअरपोर्ट्स, सुंदर विमानं, थंड लाऊंज आणि विमानामध्ये आपली काळजी घेणाऱ्या एअर होस्टेसेस आणि एअर स्टुअर्डस्. एअर पोर्टवरचे सुरक्षा अधिकारी सुद्धा काहीशा अदबीने वागतात. आता याच सुरक्षा अधिकाऱ्यांपैकी कोणी तुम्हाला मारहाण केली तर? म्हणजे तुम्ही विमानतळ बॉम्बने उडवून टाकणार असाल तर गोष्ट वेगळी पण एका साध्या गोष्टीची मागणी केल्यावर तुम्हाला थेट मारहाण होईल ही गोष्ट कल्पनेपलीकडचीच आहे. पण पाकिस्तानमध्ये ही घटना घडली आहे. पाहा हा व्हिडिओ. यातली दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात.
सौजन्य – फेसबुक
या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या सुरक्षा दलांची एक महिला अधिकारी दोन महिलांना मारताना दिसते आहे. हा भयानक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्क साईट्समधून फिरतोय. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांच्या मते ही सुरक्षा अधिकारी जिला मारहाण करते आहे ती आपल्या मुलीसोबत प्रवास करायला आलेली एक महिला आहे. या व्हिडिओमध्ये ही महिला अधिकारी त्या दोघा महिलांचे केस धरत त्यांना मारहाण करताना दिसते आहे. कारण काय तर या आई आणि मुलीने टिश्यू पेपर मागितला. आणि ही घटना कुठल्या लहान-सहान विमानतळावरची नाही तर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या एअरपोर्टची आहे.
भारत असो वा पाकिस्तान, संस्कृती जवळपास एकच. या आई-मुलीला मारहाण होत असताना आजूबाजूचे कोणीही त्यांच्या मदतीला किंवा त्या महिला अधिकाऱ्याला समजावायला पुढे आलं नाही. सगळेजणं तमाशा पाहत उभे राहिले.
या व्हिडिओमध्ये या आई-मुलीला मारहाण का होते आहे, याची कारणं सध्या हा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांकडूनच माहिती होत आहेत आणि त्याबद्द्ल संबंधित सुरक्षायंत्रणांकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं नाही. पण व्हिडिओमध्ये होणारी मारहाण नक्कीच भयानक आहे आणि ती कऱणाऱ्या महिला सुरक्षारक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.