आपल्या जवळचं कोणी गेलं की किती दु:ख होतं आपल्याला. अशा वेळी अश्रूंना वाट मोकळी करून देत आपण आपलं दु:ख वाहू देतो, कधी कधी आक्रोश करतो. दु:ख व्यक्त करण्याची ही माणसांची पद्धत. जशा आपल्याला आनंद, दु:ख, क्रोध अशा भावना असतात, तशा त्या मुक्या जीवालाही असतात. पण फारच क्वचितच एखाद्या प्राण्याला आक्रोश करताना आपण पाहतो. आपण किती सहज बोलून जातो ना ‘त्याच काळीज जनावारांसारखं आहे’ किंवा ‘जनावरासारखी त्याची कातडी आहे’ वगैरे. पण असं बोलताना एकदाही विचार आलाय का की त्यांनाही भावना असतात? तेही आपला आनंद, राग, दु:ख व्यक्त करतात. फक्त फरक एवढाच असतो की आपल्या नजरेला ते पडत नाही. जंगलात घडलेली अशीच एक दुर्मिळ घटना जबलपूरमधल्या एका फोटोग्राफरनं जगासमोर आणली आहे.
आपल्या मृत पिल्लाला घेऊन आक्रोश करणाऱ्या माकडणीचा हा फोटो होता. जे शब्द करू शकत नाही ती गोष्ट एक फोटो खूप प्रभावीपणे मांडू शकतो आणि याचे उदाहरण म्हणजे हा फोटो. एका आईचे रूदन या छायाचित्रकाराने टिपले आहे अन् हा फोटो इतका प्रभावी होता की तो पाहताच कोणाच्याही काळजात चर्रर होईल.जबलपूरमधल्या ३१ वर्षीय अविनाश लोढी याने हे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. आपल्या पिल्लाला सतत पोटाशी बांधून ठेवणाऱ्या या आईच्या काळजाचा तुकडा अचानक बेशुद्ध पडला आणि तिला काही कळायच्या आत हे पिल्लू आईला सोडून दूर निघून गेले. तेही कायमचे. ज्याला इतके महिने वाढवलं त्या पिल्लाला आपल्या डोळ्यादेखत मरताना पाहिल्यावर आईचं काय होईल हे आपण सगळेच समजू शकतो. खरंतर जंगलात किमान माणसांच्या नजरेस तरी असे प्रसंग क्वचित पडतात, पण अविनाशच्या नजरेतून मात्र ते सुटले नाही.