मुंबईत असलेल्या प्रत्येकाची काही ना काही गोष्ट असते. समोरच्या व्यक्तीशी आपली ओळख असो किंवा नसो पण वेळप्रसंगी मदतीला धावून जाणारे काही जण असतात. जीवावर बेतले तरी प्राणाची पर्वा न करता मदत करणारे नगरीकही अनेक आहेत. पण रिअल लाईफमधले असे हिरो कुठेतरी गर्दीत हरवतात. याच नायकांना लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ करते. यातल्या एका नायकाची म्हणजे टॅक्सी चालकाची गोष्ट इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. काही वर्षांपूर्वी या टॅक्सी चालकाने एका तरूणीला दारुड्यांपासून वाचवून सुखरुप घरी सोडले होते.
पंचवीसीच्या आसपास वय असलेली एक तरूणी कामावरून सुटून घरी जात होती. रात्रीचे १२.३० वाजले होते आणि काही दारुडे या तरुणीचा पाठलाग करुन तिची छेड काढत होती. रस्त्यावर शुकशुकाट असल्याने ही महिला दारुड्यांपासून आपला बचाव करण्यासाठी पळत होती. त्यावेळी रस्त्याच्या दुस-या बाजूला उभ्या असणा-या वृद्ध टॅक्सी चालकाने ते पाहिले आणि जोरजोरात टॅक्सीचा हॉर्न वाजवायला सुरूवात केली. हॉर्नच्या आवाजाने ते दारुडे पळाले आणि टॅक्सी चालकाने तरुणीला सुखरुप घरी सोडले.
३५ वर्षांपासून ते मुंबईत टॅक्सी चालवतात. गेल्या ३५ वर्षांत आपण मुंबईची अनेक रुपं पाहिली. चांगला गोष्टी पाहिल्या, पण ही गोष्ट माझ्या कायम लक्षात राहिली. या तरुणीला वाचवल्यानंतर आपले दोन्ही हात पकडून ती रडली. ‘जर मी त्याक्षणी तिच्या मदतीला धावून गेलो नसतो तर तिच्यासोबत वाईट घडले’ असते असेही त्यांनी सांगितले. या तरुणीने घरी पोहचल्यावर मिठाईचा पुडा आपल्या घरच्यांसाठी आग्रहाने पाठवून दिला ही आठवणही या टॅक्सी चालकाने सांगितले. या टॅक्सी चालकाची ही काहाणी हजारो लोक वाचत आहे. त्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल त्यांचे कौतुकही करत आहेत.