Mumbai Hindmata Rain Viral Video: राज्यभरात सध्या मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय. गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने रस्ते जलमय झालेत. यात सकाळपासून धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत पुन्हा २६ जुलैसारखी परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती मुंबईकरांनी व्यक्त केलीय. कारण सकाळपासूनचं पावसाने कमालीचा जोर पकडला आहे. रेल्वे सेवेवर याचा परिणाम झालाय. मुंबईसह उपनगरातील रस्ते पाण्याखाली गेलेत. यात अंधेरी, दादर भागांतील रस्त्यांनाही अक्षरश: नदीचे रुप प्राप्त झालेय. मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई झाल्याचे म्हणायला हरकत नाही, दरम्यान दादरच्या हिंदमाता परिसरातही दरवर्षी प्रमाणे यंदाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेय. अनेकांना या रस्त्यावरुन चालणं तर दूर वाहनांना वाट काढणंही अवघड झालं आहे. हिंदमाता परिसरातील सद्यस्थितीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यावरुन नेटकऱ्यांनी पालिका आणि सरकारची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.
”हिंदमाता परिसर की रिसॉर्ट’
पावसाळ्यात दादरच्या हिंदमाता परिसराची स्थिती काय असते हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मुंबईच्या महत्वाच्या केईएम, वाडिया, टाटा रुग्णालयांना जोडणारा हिंदमाता परिसर ओळखला जातो. रोज अनेक रुग्णवाहिका या रस्त्यांवरुन जात असतात. पण मुसळधार पावसाने येथील रस्त्याच पाण्याखाली गेल्याने सर्वसामान्यांसह रुग्णांची देखील गैरसोय होतेय.
रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अनेक वाहनं बंद पडलीत, त्यामुळे चालकांना धक्का मारत वाहनं पुढे घेऊन जावी लागत आहेत. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने येथील नागरिकांना इमारतीबाहेर पडणं अवघडं झालयं.
याच हिंदमाता परिसरातील सद्य परिस्थिती दाखवणारा एक मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. ज्यात एक व्यक्ती परिसरात साचलेल्या पाण्यात बोटीत बसवून एका लहान मुलाला फिरवताना दिसतोय. रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलय की ती बोटही आरामात पाण्यावर तरंगतेय. रस्त्यावर जाणाऱ्या शाळकरी मुलांच्या गुडघ्यापर्यंत हे पाणी आहे. समुद्रात भरतीच्या वेळी जशा लाट उसळतात तशाच लाट या रस्त्यावरील पाण्यातून उसळताना दिसतायत. अक्षरश: इमारतींच्या आतपर्यंत पाणी गेलयं.
चालकांना नीट रस्त्याच दिसत नसल्याने वाहन चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पाण्याचा प्रवाह इतका जास्त आहे की एक वाहनं अक्षरश: मागून वर उचललं झालं. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, ”परेल हिंदमाता रिसॉर्ट रेडी” असे लिहिले आहे.
“हाच तर खरा विकास” मुंबई महानगरपालिका आणि सरकारवर ओढले ताशेरे
दरम्यान, @manishadvilkar नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, या व्हायरल व्हिडीओवरून आता नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. तसेच मुंबई महानगरपालिका आणि सरकारवर ताशेरे ओढले आहेत. एका युजरने कमेंटमध्ये मिश्कीलपणे लिहिलेय की, परेल हिंदमाता रिसॉर्टचा रेट काय आहे, तर दुसऱ्या एकाने लिहिलेय की, हाच तर खरा विकास केला आहे दादा. आपल्या मराठी पक्ष व नेते लोकांनी टॅावरमध्ये राहणाऱ्यांना कसे स्विमिंग पुल दिले आहेत. तसे आपल्या सामान्य मराठी माणसासाठी ही सोय करून दिली आहे, तिसऱ्या एका युजरने लिहिलेय की, किती चांगले नगरसेवक आहे किती चांगल्या सुविधा दिल्यात. अशाप्रकारे युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स करत बीएमसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.