आपल्या हिंदू मित्रांसाठी मध्य प्रदेशातील अरीफ यांनी खास हिंदू पद्धतीने लग्नाची पत्रिका छापून घेतली आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरूवात गणपतीच्या आशीर्वादाने करण्याची हिंदू संस्कृतीत परंपरा आहे. म्हणूनच तर लग्नपत्रिकेवरही गणपती असतो. हे अरीफ यांना कळल्यावर त्यांनी आपला भाऊ सलीम याची लग्नपत्रिका तशाच प्रकारे छापून हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक अनोखं उदाहरण समाजापुढे ठेवलं. अरीफ यांचे अनेक मित्र हे हिंदू आहेत. तेव्हा लग्नात त्यांच्यासाठी खास शाकाहारी मेजवानी अरीफ यांनी ठेवली. आपल्या हिंदू मित्रांना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी त्यांनी उत्साहात हिंदू पद्धतीने लग्नपत्रिका बनवून घेतली. ही लग्न पत्रिका पाहून अरीफ आणि त्याच्या कुटुंबियांचे खूप कौतुक होत आहे. अरीफच्या मित्रांनाही त्याची ही कल्पना खूपच आवडली. पण अशा प्रकारे लग्नपत्रिका बनवणे अरीफना खूपच महागात पडले. मित्र परिवारात पत्रिका वाटल्यानंतर अनेकांकडून त्यांना धमकीचे फोन येत होते. काही समाज कंटकांनी फोन करून आपल्याला यावरून गेल्या दोन दिवसांपासून त्रास दिला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी ‘एएनआय’ला दिली.