प्रादुर्भाव असं सगळं पाहता एखाद्या चित्रपटाची स्क्रीप्ट वाटते असं म्हटलं आहे. जगभरामध्ये अनेक गोंधळात टाकणाऱ्या घटना समोर येत असतानाच आता ऑस्ट्रेलियामधून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील अ‍ॅडलेड विमानतळाबाहेर फेब्रुवारी महिन्यापासून एक बीएमडब्ल्यू गाडी उभी असून ती कोणाच्या मालकीची आहे यासंदर्भातील माहिती कोणालाच नाहीच. विशेष म्हणजे या गाडीचा क्रमांक ‘COVID 19’ असा आहे. ऑस्ट्रेलियांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापासून विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी ठरवून देण्यात आलेल्या पार्किंगमध्ये ही गाडी उभी आहे. त्यामुळेच आता या गाडीसंदर्भातील गूढ आणखीन वाढल्याचे एबीसी नेट या ऑस्ट्रेलियन वेबसाईटने म्हटले आहे.

या बीएमडब्ल्यू गाडीचा फोटो एबीसी रेडिओ अ‍ॅडलेडला विमानतळावर काम करणाऱ्या स्टीव्हन स्प्रे या कर्मचाऱ्याने पाठवला. या कर्माचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियामध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून ही गाडी येथेच आहे. करोना विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने ११ फेब्रुवारी रोजी ‘COVID 19’ हे अधिकृत नाव दिलं. त्यानंतर महिन्याभराने ही जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आली. “आमच्या सर्वांच्या आठवणीनुसार फेब्रुवारी किंवा त्याच्याही आधीपासून ही गाडी येथेच उभी आहे. मार्च महिन्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना विमानतळ बंद ठेवण्यात आल्याने सुट्टीवर पाठवण्यात आले तेव्हाही ही गाडी येथेच होती,” असं स्टीव्हन म्हणाला.

नक्की वाचा >> ‘या’ देशाने आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली ६८ हजार कोटींची पगारवाढ

गाडीवर कव्हर टाकण्यात आलं होतं मात्र एप्रिल महिन्यामध्ये वाऱ्याने गाडीवरील कव्हर एका बाजूने उडालं. त्यामुळे गाडीची नंबर प्लेट दिसू लागली. ही नंबर प्लेट पाहून सर्वांनाच धक्का बसल्याचेही स्टीव्हन म्हणाला. या गाडीचा नंबर दिसू लागल्यापासून ती कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. “आमच्यापैकी काही जणांच्या मते ही एखाद्या वैमानिकाची गाडी असावी जो परदेशात गेला असावा आणि लॉकडाउनमुळे तिकडेच अडकून पडला असावा,” असं कर्मचाऱ्यांमधील चर्चेबद्दल बोलताना स्टीव्हन सांगतो. या गाडीची किंमत पाहता ही एखाद्या श्रीमंत व्यक्तीचीच असावी असा येथील कर्मचाऱ्यांचा अंदाज आहे. तसेच कर्मचाऱ्यांना विमानतळावरील पार्किंगमध्ये केवळ ४८ तास गाडी ठेवण्याची परवानगी आहे असंही स्टीव्हन सांगतो.

Photo: ABC News

नक्की वाचा >> देश लहान पण मूर्ती महान… डॉक्टरांच्या सन्मानार्थ उभारला २० फूट उंच पुतळा

दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये भारताप्रमाणेच हवे तसे क्रमांक गाडीसाठी देण्यात येतात. अधिक पैसे देऊन हवा तो क्रमांक गाडीसाठी मिळवता येते. अशाप्रकारे हवा तो क्रमांक मिळवण्यासाठी किमान १० दिवसांचा कालावधी लागतो असं दक्षिण ऑस्ट्रेलियातील उद्योग मंत्री डेव्हिड पीसोनी यांनी एबीसी रेडिओ अॅडलेडशी बोलताना सांगितलं. या गाडीची नोंदणी सप्टेंबर २०२० पर्यंत करण्यात आली असल्याचे स्थानिक वाहतूक विभागाच्या वेबसाईटवर दिसतं.