पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यामध्ये केलेल्या भावनिक भाषणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. गोव्याच्या व्यासपीठावरुन नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली. २ जी घोटाळा, कोळसा घोटाळा हे विषय  करणाऱ्या लोकांना ४००० रुपयांसाठी रांगेत उभे केल्याचे सांगत मोदींनी काळ्या पैशासंदर्भातील निर्णय हा गोरगरिबांच्या हिताचा असल्याचे सांगितले. दरम्यान काळ्या पैशाच्या मुद्यावरुन राहुल गांधी यांनी रविवार ट्विटवरुन पंतप्रधानावर निशाणा साधला. गरिब रडत असताना मोदी हसत आहेत. असे ट्विट राहुल गांधी यांनी केले. आपल्या ट्विटसोबत राहुल गांधीनी नरेंद्र मोदी यांचा भाषणाचा हसतानाचा व्हिडिओ शेअर केला.

[jwplayer pu6Ddkht]

राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर नेटीझन्सनमधून समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. मोदी गरीबांना नव्हे तर भ्रष्टाचारांची अवस्था पाहून हसत असल्याचे मत एका नेटीझन्सने व्यक्त केले आहे. एका महिला नेटीझन्सने मोदींच्या प्रतिनीधीत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. सुमित मिश्रा नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने राहुल गांधीचा जवानांच्या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी मोबाइलवर संभाषण करताना हसताना दिसत आहेत. शहिद जवानांच्या भेटीला गेल्यानंतर राहुल गांधी हसत होते, असे ट्विट मिश्राने केले. तर एका नेटीझन्सने नोट बंदी आहे नस बंदी नाही, असे ट्विट करुन काँग्रेसच्या नसबंदी निर्णयाची राहुल गांधी यांना आठवण करुन देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

गोव्यातील व्यासपीठावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशासंदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल सहानुभूती दर्शवली होती. यावेळी त्यांनी ७० वर्षांचा रोग १७ महिन्यांमध्ये बरा करायचा आहे. लोकांना होणाऱ्या त्रासाची कल्पना आहे. पण देशवासियांनी फक्त ५० दिवस त्रास सहन करावा. असे आवाहन केले.