Bengaluru Tech Job Smallest AI Hiring: एआय हे आता सर्व तंत्रज्ञानाचे भविष्य असून मानवाचे भावी आयुष्य एआयनं व्यापलेलं असेल, हे आता सर्वच मान्य करत आहेत. कृषी क्षेत्रातही एआयचा वापर केला जाणार आहे. त्यामुळेच एआय विकसित करण्यासाठी कंपन्या आपले कौशल्य पणाला लावत आहेत. त्यांना आवश्यकता आहे कुशल मनुष्यबळाची. असे कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. मात्र बंगळुरूतील एका कंपनीच्या जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नोकरीची जाहिरात म्हटली की मग पुढे, सीव्ही, शैक्षणिक पात्रता सिद्ध करणारी कागदपत्रे, अनुभवाची प्रमाणपत्रे आणि मुलाखतीचे अनेक टप्पे… असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र बंगळुरुतील एका स्टार्टअपनं या पारंपरिक पद्धतीला फाटा देत थेट एक कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. तेही सीव्ही, शैक्षणिक अहर्ता न तपासता आणि दीर्घ मुलाखती न घेता, ही नोकरी दिली जाणार आहे.

बंगळुरूतील स्मॉलेस्ट एआय कंपनीचे संस्थापक सुदर्शन कामथ यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सदर ऑफर दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले की, उमेदवाराला वार्षिक ६० लाख रुपयांचे निश्चित वेतन दिले जाईल आणि ४० लाख रुपयांची कंपनी इक्विटी दिली जाईल. बंगळुरूतील कार्यालयात येऊन आठवड्यातील पाच दिवस काम करावे लागणार आहे.

या नोकरीसाठी कामथ यांनी सीव्ही वैगरेची औपचारिकता न ठेवता केवळ १०० शब्दांची स्वतःची माहिती आणि उमेदवाराने केलेल्या उत्तम कामाचे नमुने मागितले आहेत. तुम्ही कुठून शिकलात आणि तुमचा सीव्ही कसा आहे, याच्याशी कंपनीला काहीही देणेघेणे नाही, असेही कामथ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sudarshant Kamath Job Post
बंगळुरूतील स्मॉलेस्ट एआयचे संस्थापक सुदर्शन कामथ यांची व्हायरल पोस्ट

कौशल्य हवे, कागदपत्रे नको

या व्हायरल पोस्टमध्ये कामथ यांनी म्हटल्यानुसार, उमेदवाराला ४ ते ५ वर्षांचा अनुभव असावा. त्याला Next.js, Python आणि React.js या सॉफ्टवेअर्सचं ज्ञान असावं. ही नोकरी प्रत्यक्ष काम करणाऱ्या डेव्हलपरसाठी आहे. यात कुठेही व्यवस्थापकीय भूमिका नसेल, असेही कामथ यांनी स्पष्ट केले आहे.

नेटिझन्सची प्रतिक्रिया काय आहे?

सुदर्शन कामथ यांच्या पोस्टला ६० हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तर अनेकांनी त्यावर आपली मते व्यक्त केली आहेत. ही जाहिरात अनेकांना आवडली असून प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना आणि कौशल्य असलेल्या तंत्रज्ञांना नक्कीच न्याय देणारी आहे, असे मत काहींनी व्यक्त केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, ही खरंच चांगली संधी आहे. फक्त कंपनीने कार्यालयात बोलविण्याऐवजी हायब्रिड पद्धतीने काम करण्याची परवानगी द्यावी.