करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे करोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाला आळा बसत असला तरी रोजंदारी करणाऱ्या लोकांना भुकेनं ग्रासल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेकजणांची उपासमारी होत आहे. अरूणाचलप्रदेशमधील असंच एक प्रकरण समोर आलं आहे. तीन जणांनी भूक भागवण्यासाठी १२ फूटांचा किंग कोब्रा खाल्ला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अरुणाचल प्रदेशमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तीन जणांनी १२ फूटाच्या किंग कोब्राला मारून खांद्यावर घेतलेलं दिसत आहे. व्हिडिओत ते म्हणत आहेत की, ‘जगातील सर्वात विषारी सापाला खाण्यासाठी जंगलात मारलं आहे.’ व्हिडिओत स्पष्ट दिसतेय की, जंगी पार्टीची व्यवस्था केली आहे. सापला कापून त्याचं मांस साफ करत आहेत. स्वच्छ केलेलं मांस केळीच्या पानावर ठेवलं आहे.
करोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे घरात खाण्यासाठी काहीही नाही, तांदूळही शिल्लक नाहीत. त्यामुळेच आम्ही जंगलामध्ये खाण्यासाठी काही शोधत होतो. त्यावेळीच आम्हाला किंग कोब्रा मिळाला, असं व्हिडिओत एक व्यक्ती बोलत असल्याचं स्पष्ट ऐकू येत आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, वन आधिकाऱ्यानं या प्रकरणावर सांगितले की, वन्यजीव संरक्षण अधिनियमांनुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तिघेही पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, भारतामध्ये करोना व्हायरसचं संक्रमण वाढलं आहे. दिवसागणिक मृत्यूची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त जणांचा या महामारीनं बळी घेतला आहे. तर १६ हजारापेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत देशांत लॉकडाउनची घोषणा केली आहे.