प्राण्यांना त्रास देऊ नये अशी शिकवण आपल्याला लहानपणापासून दिली जाते. त्यातही जंगली प्राण्यांना त्रास दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात असंही अनेकदा आपण सर्वांनी ऐकलं असेल किंवा डिस्कव्हरीसारख्या वाहिन्यांवरील मालिकांमध्ये पाहिलं असेल. मात्र सर्वांनाच हे ठाऊक असतं असं नाही. असंच काहीसं झालं एका आजोबांबरोबर ज्यांनी कारण नसताना रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या बैलावर काठीने वार केला. आजोबांनी कारण नसताना केलेल्या या हल्ल्यानंतर जे काही झालं त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ नक्की कुठला आणि कधीचा आहे ठाऊक नाही मात्र प्राण्यांना त्रास देऊ नये ही शिकवण या व्हिडीओमधून नक्कीच मिळतेय. हा व्हिडीओ एका सीसीटीव्ही फुटेजमधील असल्याचे दिसून येत आहे. व्हिडीओत एक बैल भिंतीजवळ शांतपणे उभा असल्याचे दिसते. या बैलाच्या समोरच गल्लीच्या दुसऱ्या बाजूला दोन व्यक्ती बसल्या आहेत. प्रत्येकजण आपआपल्या कामात व्यस्त असताना दिसत आहे. अचानक एक म्हतारी व्यक्ती या व्हिडिओमध्ये हातात काठी घेऊन चालत येताना दिसते. बैलाजवळून काही अंतर पुढे गेल्यावर ही व्यक्ती पुन्हा मागे फिरते आणि बैलाजवळ येते आणि हातातील काठीने बैलाला मारु लागते. ही व्यक्ती आधी बैलाच्या पाठीवर आणि नंतर शिंगाजवळ काठीने हल्ला करते.

ही व्यक्ती तिसऱ्यांदा बैलाला काठीने मारायला जाणार तितक्यात बैल चौताळतो आणि या व्यक्तीला शिंगावर घेतो. सामान्यपणे एखाद्या चित्रपटामधील विनोदी दृष्य वाटावे अशाप्रकारे हा बैल या व्यक्तीला हवेत उडवताना या व्हिडीओत दिसतो. काही सेंकद हवेत उडून ही व्यक्ती जोरात रस्त्यावर पडते. नंतर हा बैल तिथून पळून जातो. ही व्यक्ती सावकाश उठते आणि जरा लंगडत चालू लागते.

या व्हिडीओला ४७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेदार प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. मात्र यामधून प्राण्यांना उगाच त्रास दिल्यास शिक्षा मिळतेच हेच दिसून येत असल्याचंही काहींनी म्हटलं आहे.