आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य ऐकायला मिळते. परंतु या घोषवाक्याची अमंलबजावणी क्वचितच केली जाते. असेच एक उदाहरण समोर आले आहे. कर्नाटकमधील एका आजींनी झाडे वाचवण्साठी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या आजींनी रस्त्याच्या विस्तारीकरणात तोडल्या जाणाऱ्या झाडांना वाचवण्यासाठी  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या वृक्षप्रेमी आजींची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

१९६०च्या सुमारास रामानगर जिल्ह्यातील कुडूर आणि हुडिकल दरम्यान चार किलोमीटरच्या महामार्गावर थिम्माक्का यांनी ३८५ केळीच्या झाडांची लागवड केली होती. तसेच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला देखील शेकडो झाडे लावली होती. परंतु काही दिवसांनंतर या महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पाचा ठराव कर्नाटक सरकार कडून मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पात शेकडो झाडे तोडण्यात येणार होती. थिम्माक्का यांना आपल्या मुलाप्रमाणे वाढवलेली झाडे तोडणे हे मान्य नव्हते. ही झाडांची तोडणी थांबवण्यासाठी त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांना थिम्मक्का यांनी विनंती केली.

‘मी जगवलेली झाडे मी तोडू देणार नाही. मी या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास सरकारला परवानगी देणार नाही’ असे थिम्माक्का यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.

थिम्माका यांचे वृक्षप्रेम पाहता जी परमेश्वरम म्हणाले की, ‘हे खरे आहे की तिने ही झाडे आपल्या मुलांसारखी वाढवली आहेत. आता ही झाडे सुरक्षित ठेवणे आपली जवाबदारी आहे. आम्ही रस्त्याच्या विस्तारीकरणसीठी काही वेगळा पर्याय शोधून काढू, जेणेकरुन या झाडांना हानि पोहोचणार नाही.’

थिम्माका यांना पद्मश्री, कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार, हम्पी विद्यापीठातील नाडोजा पुरस्कार आणि भारत सरकारकडून राष्ट्रीय नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.