चीनमधील लोकसंख्या वाढल्याने काही वर्षांपूर्वी या देशात ‘एक जोडेपे एक मूल’ असा नियम सरकारने लागू केला होता. अशाच स्वरुपाचा आणखी एक नियम नुकताच चीन सरकारने केला असून तो श्वानांशी निगडीत आहे. यामध्ये ‘एक श्वान धोरण’ राबविण्याचे ठरविले आहे. चीनच्या पूर्वेकडे असलेल्या कींग्डाओ शहरासाठी हा नियम नुकताच लागू कऱण्यात आला आहे.
हा नियम न पाळणाऱ्यांकडून दंड आकारण्यात येणार असून एकहून अधिक श्वान बाळगणाऱ्यांना ३०० डॉलर इतकी रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. ज्यांच्याकडे आधीपासून दोन श्वान आहेत त्यांना हा नियम लागू होणार नसल्याचे सरकारने यामध्ये जाहीर केले आहे. मात्र ज्यांच्याकडे आधी एक श्वान आहे ते यापुढे आणखी एक श्वान घेऊ शकणार नाहीत असे या नियमात नमूद कऱण्यात आले आहे.
याशिवाय रहिवाशांना घातकी असणाऱ्या श्वानांच्या ४० प्रजातींची वंशवाढ (ब्रिडींग) करण्यास मनाई कऱण्यात आली आहे. यामध्ये जर्मन शेफर्ड, तिबेटन मास्टीफ्स आणि पीट बुल्स या मनाई कऱण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या प्रजाती आहेत. श्वान पाळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ६० डॉलर इतकी रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार आहे असेही या नव्या नियमांत नमूद कऱण्यात आले आहे. या श्वानांना कायम दोरी बांधलेली असावी तसेच त्यांच्या गळ्यात त्यांची माहिती असलेले इलेक्ट्रीक आयडी कार्ड घालणे बंधनकारक असल्याचेही या नियमांत म्हटले आहे.
श्वानांशी निगडीत अशाप्रकारचा नियम लावणारे कींग्डाओ हे चीनधील तिसरे शहर आहे. याआधी बिजिंग आणि शांघाय याठिकाणी हा नियम लागू कऱण्यात आला होता. २०१५ मधील अंदाजानुसार चीनमध्ये १० कोटी पाळीव प्राणी असून त्यापैकी ६२ टक्के श्वान आहेत.