इटलीमधील रोम शहरात एक विचित्र अपघात घडला. येथील मेट्रो स्थानकामधील एस्केलेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने २० हून अधिक प्रवासी जखमी झाले. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

रिपब्लिका मेट्रो स्थानकामधील एस्केलेटरचा वेग अचानक वाढल्याने त्यावर उभे असणारे २० हून अधिक प्रवासी जखमी झाले. यात अनेकांच्या पायाला दुखापत झाली आहे. एस्केलेटरमधील मॅग्नेटिक मशीनमध्ये पाय अडकल्याने अनेकजण जखमी झाल्याने स्थानिक प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. एका डझनहून अधिक लोकं एस्केलेटरवरून खाली जात असताना अचानक त्याचा खाली जाण्याचा वेग वाढल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. यापैकी बरेच प्रवासी खाली पडले आणि एस्केलेटर संपतो तिथे प्रवासी एकावर एक पडले. अनेकांना बाजूच्या एस्केलेटरवरील प्रवाशांनी खेचून पलिकडे घेण्याचा प्रयत्न केल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे.

अपघातात जखमी झालेल्यांमध्ये फुटबॉल चाहत्यांची संख्या जास्त आहे. चॅम्पियन्स लीगमध्ये काल इटलीतील रोम संघाचा सामना रशियाच्या सीएकेएस मॉस्को या संघाशी झाला. या सामन्याच्या ठिकाणी पोहचण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुटबॉल चाहते मेट्रो स्थानकातून प्रवास करत होते त्याचवेळी हा अपघात झाला. हा अपघात होण्याआधी हे फुटबॉल चाहते दारु पिऊन या एस्केलेटवर उड्या मारत होते, दंगा मस्ती करत होते अशी माहिती उपस्थितांनी दिली आहे. मात्र फुटबॉल चाहत्यांनी हे आरोप नाकारले असून तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत करण्यास सुरुवात केली. मेट्रो स्थानकात नक्की काय झाले हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच सर्व जखमींच्या आम्ही पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया रोम शहराच्या महापौर व्हर्जिनिया रेगी यांनी दिली आहे.