देशातील काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयानंतर देशात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना मोदींच्या या निर्णयाची चर्चा पाकिस्तानमध्ये सुद्धा चांगलीच रंगली आहे. ८ नोव्हेबरला मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रूपयांच्या चलनी नोटा बंद करण्यात येणार असल्याचे मोदींनी जाहीर केले. पंतप्रधानांनी अचानकपणे घेतलेल्या या निर्णयाला भारतीय प्रसारमाध्यमांनी भ्रष्टाचाऱ्यांचे सर्जिकल स्ट्राईक असे संबोधले होते. देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर देशभरातून पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तर विरोधकांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांच्या बंदीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. काँग्रेस, आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काळ्या पैशांविरुद्ध सुरू केलेल्या लढाईला विरोध दर्शविला आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याचा सरकारचा निर्णय सर्वसामान्यांना त्रासदायक असल्याच्या प्रतिक्रिया विरोधी गोटातून उमटताना दिसत आहे.  काळ्या पैशाविरोधातील लढाईत देशात दोन प्रवाह दिसत असताना पाकिस्तानमध्ये मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

देशभरात काळ्या पैशाच्या या निर्णयाबद्दल चर्चा रंगत असताना पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मोदींनी घेतलेला निर्णय पाकिस्तान कधीच घेऊ शकणार नाही, अशी चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगल्याचे पाहायला मिळाले. मोदींनी काळ्या पैशासंदर्भात कडक धोरण अवलंबल्यानंतर पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी मोदींच्या निर्णयानंतर चर्चा सत्रे घेतली. पाकिस्तानी प्रसारमाध्यमात काळ्या पैशाबाबत  रंगलेली चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.