सध्या सोशल मीडियामुळे जगाच्या पाठीवर कुठेही बसून कोणतीही गोष्ट अगदी सहज शेअर करता येऊ शकते. तसेच फेसबुक, ट्विटर यांसारख्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट राहणे अगदी सोपे झाले आहे. पण या माध्यमांचे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरुन हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ही गोष्ट साधीसुधी नसून एका भारतीय विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीनंतर पाकिस्तानी लष्कराचे ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद करण्यात आले आहे.

त्याचे झाले असे की, दिल्ली विद्यापीठातील कवलप्रीत या विद्यार्थिनीने आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. जामा मशिदीबाहेरील या फोटोत तिच्या हातात एक फलक असून त्यावर तिने स्वत:चे विचार व्यक्त केले होते. मात्र, या फोटोत तिच्या हातात असणाऱ्या फलकावरील मजकुरात फेरफार करून तो ट्विटवर प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र, नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटोतील फलकावरचा मजकूर आक्षेपार्ह होता. फलकावर लिहिले होते की, मी भारतीय आहे पण मला भारताविषयी तिरस्कार आहे. कारण भारताने नागालँड, काश्मिर, मणिपूर, हैद्राबाद, जुनागड अशा अनेक ठिकाणांवर आपला कब्जा केला आहे.

साहजिकच हा फोटो अगदी कमी वेळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि कवलप्रीतवर सर्वच स्तरातून जोरदार टीका व्हायला लागली. त्यामुळे तिने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. आपल्या मूळ फोटोबाबतही तिने यावेळी पोलिसांनी सांगितले. मूळ फोटोमध्ये तिच्या हातातील बोर्डवर वेगळा मजकूर होता. मी भारतीय आहे. मी आपल्या संविधानातील धर्मनिरपेक्ष मूल्यांसोबत आहे. मी आपल्या देशात मुस्लिम बांधवांच्या विरोधात होत असलेल्या सांप्रदायिक हिंसेच्या विरोधात लिहिणार आहे. हरियाणामधील जुनैदची हत्या झाल्यानंतर देशभरात झालेल्या मोहिमेत हा संदेश लिहल्याचे तिने स्पष्ट केले. परंतु हा फोटो चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्याने आपल्याला बराच मनस्ताप सहन करावा लागला असेही ती म्हणाली.