जगात असे अनेक देश आहेत जिथे ट्रान्सजेंडर आपल्या हक्कासाठी लढत आहेत. इतर सामान्य माणसांसारखे हक्क त्यांना नाकारले जात आहे. पण तरीही आपल्या जिद्दीच्या जोरावर विविध क्षेत्रात ते पुढे येऊन प्रगती करत आहेत. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर माविया मलिक हिला एका खासगी वृत्त वाहिनीनं अँकरिंगची संधी दिली आहे. पाकिस्तानमध्ये पडद्यावर झळकलेली ती पहिलीच वृत्तनिवेदिका आहे. पाकिस्तानसारख्या देशानं खुल्या मनानं तिला प्रेक्षकांसमोर सादर व्हायची संधी दिली म्हणूनच जगभरातून या गोष्टीचं कौतुक होत आहे.

खासगी वाहिनी ‘कोहिनूर न्यूज’वर माविया पहिल्यांदाच झळकली. याआधी मावियानं मॉडेलिंग क्षेत्रातही आपलं नशीब आजमावलं आहे. एका फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करून तिनं जगाचं लक्ष स्वत:कडे वेधलं होतं. पाकिस्तानी समाजात आजही ट्रान्सजेंडरना सन्मानिय वागणूक दिली जात नाही. नोकरी मिळत नसल्यानं अनेकांना भीक मागून आपलं पोट भरावं लागत आहे. पण मावियाच्या उदाहरणामुळे अनेकांना आपल्या क्षेत्रात ठसा उमटवण्याची प्रेरणा मिळाली आहे. नुकतंच पाकिस्तानच्या संसदेत तृतीयपंथीयांच्या सुरक्षेसाठी बिल पास करण्यात आलं.