scorecardresearch

दारूची तलफ आली म्हणून ट्रेन स्टेशनवरच सोडून गेला लोको पायलट; प्रकार लक्षात येताच…

पोलीस त्याला शोधत असताना तो मद्यधुंद अवस्थेत स्थानिक बाजारात सापडला.

सहाय्यक लोको पायलटला दारुची तलफ आल्यानं एक ट्रेन तासभर उशिरा धावल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रेन स्टेशनवर सोडून लोको पायलट दारू प्यायला निघून गेला होता. बराच वेळ होऊनही ट्रेन न सुटल्याने चौकशी केली असता हा उघडकीस आला. दरम्यान या लोको पायलटच्या कृत्यावर ट्रेनधील प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. ही घटना बिहारमध्ये घडली आहे.

बिहारमधील समस्तीपूर रेल्वे विभागाच्या हसनपूर स्थानकावर सहाय्यक लोको पायलट दारू पिण्यासाठी गेल्याने एक पॅसेंजर ट्रेन तासाभराहून अधिक काळ स्टेशनवर थांबून होती. राजधानी एक्स्प्रेसला आधी जाऊ देण्यासाठी समस्तीपूर ते सहरसा ही पॅसेंजर ट्रेन हसनपूर स्थानकावर काही वेळ थांबवण्यात आली होती. यावेळी ट्रेनचे असिस्टंट लोको पायलट (ALP) करणवीर यादव हे इंजिनमधून गायब झाले. सिग्नल देऊनही गाडी न हलल्याने सहाय्यक स्टेशन मास्तरांनी याबाबत चौकशी केली. दरम्यान, ट्रेनला उशीर झाल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनीही गोंधळ घातला होता.

अशातच लोको पायलट यादवचा शोध सुरू करण्यात आला. त्याला शोधण्यासाठी रेल्वे पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस त्याला शोधत असताना तो मद्यधुंद अवस्थेत स्थानिक बाजारात सापडला. त्याला जागेवर सरळ उभे राहता येत नव्हते, अशी त्याची अवस्था झाली होती. दरम्यान, पोलिसांनी या असिस्टंट लोको पायलटला अटक केली असून विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) आलोक अग्रवाल यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Passenger train delayed by an hour as driver gets off to have a drink in bihar hrc