जगभरात अन्नाची किती नासाडी होते. आजही आपल्या देशातील लाखो लोक उपाशी पोटी झोपतात. असे कितीतरी देश आहे जिथे लोकांना पोटभर अन्नही मिळत नाही. अन्नाआभावी या लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. तेव्हा एकवेळ आपण कमी जेवलं तरी चालेल पण अन्नाचा एक दाणा देखील वाया जाता कामा नये, अशी विनंती लोकांना वारंवार केली जाते. पण काही लोक यापलीकडचा विचार करतात. लोक अन्नाची नासाडी करणं थांबवतीलही पण उपाशीपोटी झोपणाऱ्यांची संख्या काही कमी होणार नाही, तेव्हा पाटण्यामध्ये राहणाऱ्या ऋषिकेश नारायण सिंह याला एक कल्पना सुचली आणि त्याने सुरू केली ‘रोटी बँक’.

या उपक्रमाचा उद्देश एकच की रस्त्यावर राहणाऱ्या कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये. यासाठी ऋषिकेश अन्न गोळा करतो आणि गरजूंमध्ये या अन्नाचे वाटप करतो. सध्या पाटण्यामध्ये त्याची ही रोटी बँक कार्यरत आहे. त्याने सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर आपला ग्रुप तयार केला आहे. ज्यांच्याघरी अन्न उरले आहे ते स्वच्छेने ऋषिकेशला फोन करतात आणि अन्नदान करतात. हे अन्न रोटी बँकेतर्फे गरिबांना वाटलं जातं. एक साधी सोपी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोणालाही रोटी बँकचे सदस्य होता येतं. या बँकेचे सदस्य गरजूंसाठी अन्नदान करतात. अन्नाची गुणवत्ता ही चांगलीच असावी यासाठी अन्नदात्याची नोंदणी करून घेणं ऋषिकेशला आवश्यक वाटतं. ऋषिकेशने राबवलेल्या या उपक्रमाचे खूपच कौतुक सोशल मीडियावर होत आहे. जर प्रत्येकानं पुढाकार घेत अशा प्रकारचा उपक्रम राबवला तर देशातील लाखो गरिबांना उपाशी पोटी झोपावे लागणार नाही हे नक्की!