आपल्या उत्पदानाची योग्य जाहिरात कशी करायची हे विक्रेत्याला माहिती असले पाहिजे, जो ओरडेल त्यांची मातीही विकली जाते अन् जो गप्प बसेल त्याचे सोनेही खपत नाही! हा साधा नियम आहे. रस्त्यावर अनेक फळविक्रेते असतात. आता सगळ्यांची फळे विकली जातातच असे नाही. कोण फळांचा भाव कमी ठेवतो म्हणून त्याच्याकडे ग्राहकांची गर्दी असते तर कोणाकडे ताजी रसाळ फळे असतात म्हणून ग्राहक विक्रेता सांगेल ती किंमत मोजायला तयार होतो. तर कधी कधी फळांची रचना आणि त्यांची पॅकिंगच अशी केलेली असते की फळाची चव, किंमतीकडे दुर्लक्ष करून आपण ती विकत घेतो. पण जिथे फळांची शेकडो दुकाने आहेत तिथे आपला माल कसा विकला जाईल याची चिंता प्रत्येक विक्रेत्याला असते. पण या स्मार्ट फळवाल्याला मात्र हा प्रश्न पडला नसेल एवढं नक्की. कारण आपल्या हातगाडीवरची हिरवी सफरचंद विकण्यासाठी त्यांनी भन्नाट शक्कल शोधून काढली.

वाचा : नववर्षातील पहिल्या ट्यूना माशावर चक्क ४ कोटींची बोली!

युट्युबवर एका फळविक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तशी हिरवी सफरचंद आरोग्यास उत्तम म्हणून ती विकली जाणार हे नक्की. पण त्याचा सर्वाधिक खप कसा करावा आणि लोकांना कसे आकर्षित करून घ्यावे यावर या फळ विक्रेत्याने भन्नाट युक्ती शोधून काढली. आपल्या हातगाडीवर त्याने छोटेसे यंत्र बसवले. या यंत्राने डोळ्याची पापणी लवते न लवते तोच सफरचंद सोलूनही निघते अन् त्याची कापंही निघतात. त्यामुळे ही ट्रिक बघण्यासाठी का होईना लोक मुद्दाम त्याच्याकडून फळं विकत घेतात. त्याच्या हातगाडीवरही सफरचंदाच्या सालींचा एवढा खच पडलेला आहे की ते पाहून याने विक्रमी विक्री केली असणार हे नक्कीच!