काँग्रेस नेता आणि खासदार शशी थरूर हे नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चेचा विषय असतात. आपल्या राजकीय भाषणांबरोबर इंग्रजीमधील कधीही न ऐकलेले शब्द आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन एखाद्या वाक्यामध्ये पोस्ट करणारे थरुर हे राजकारणाच्या पलिकडे जाऊन तरुणांशी संवाद साधण्यासाठी ओळखले जातात. तिरुवनंतपुरमचे खासदार असलेले थरुर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे.

झालं असं की थरुर अनेकदा त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईटवरुन स्वत:चे फोटो पोस्ट करत असतात. त्यांनी पोस्ट केलेल्या अशाच एका फोटोवरुन नेटकऱ्यांना प्रश्न पडला. या फोटोमध्ये थरुर यांनी गळ्यात घातलेलं डिव्हाइस नक्की आहे तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला. अखेर एका ट्विटर युझरने थरुर यांचा हा फोटो ट्विट करुन त्यांना टॅग करत ‘हे यंत्र काय आहे?’ असा सवाल थरुर यांना विचारला.

आता थरुर यांना विचारलेल्या प्रश्नाने त्यांनी उत्तर देण्याआधीच नेटकऱ्यांनी ही गोष्ट काय असेल याबद्दलच्या शक्यता व्यक्त करणाऱ्या कमेंटचा पाऊस या फोटोवर पाडला.

डिक्शनरी असेल

भाषांतर करणारं यंत्र असेल

श्रवणयंत्र

जीपीएस

मात्र अनेकांनी उत्तर देऊनही कोणालाही ते यंत्र नक्की काय आहे हे सांगता आलं नाही. अखेर थरुर यांनीच या पोस्टवर कमेंट करुन या यंत्राची माहिती दिली. “तो एअर प्युरिफायर (निगेटीव्ह आयोनायझर) आहे. दिल्लीतली हवा श्वसनासाठी योग्य नाही. मी तिरुवनंतपुरममध्ये हे यंत्र वापरत नाही,” असं ट्विट थरुर यांनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थरुर यांच्या या ट्विटला शेकडो लोकांनी लाइक केलं आहे. आतापर्यंत १९ पुस्तके थरुर यांनी लिहिली असून ते आपल्या संवाद कौशल्यासाठी जगभरामध्ये ओळखले जातात. त्यामुळेच ते कार्यक्रमांबरोबर सोशल नेटवर्किंगवरुनही आपल्या चाहत्यांशी अशाप्रकारे लहक्या पुलक्या गोष्टींसंदर्भात संवाद साधताना दिसतात.