पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा वगळता एकाही नेत्याला नरेंद्र मोदींइतके फॉलोअर्स नाहीत. त्यामुळेच मोदी जेव्हा एखादी गोष्ट किंवा फोटो पोस्ट करतात तेव्हा त्याची चर्चा देशातच नाही तर जगभरामध्ये होते. सध्या असेच चित्र पहायला मिळत आहे मोदींनी अमेरिकेसाठी उड्डाण केल्यानंतर एअर इंडिया वनमधून पोस्ट केलेल्या एका फोटोची.

नक्की पाहा हे फोटो >> अमेरिकेत पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत; पाहा खास फोटो

झालं असं की बुधवारी दुपारच्या सुमारास पंतप्रधान मोदी अमेरिकेसाठी दिल्लीमधून रवाना झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी मोदी अमेरिकेला रवाना झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत करोना महासाथ, दहशतवाद, हवामान बदल व इतर महत्त्वाचे मुद्दे आपण मांडणार आहोत, असं मोदी म्हणाले. मोदींनी विमानात बसल्यानंतर काम करतानाचा एक फोटो ट्विटरवरुन शेअर केला होता. रात्री पावणे अकराच्या सुमारास मोदींनी शेअर केलेल्या या फोटोला सध्या १२ तासांच्या आतमध्ये १८ हजारांहून अधिक रिट्विट मिळाले आहेत. “फार दिर्घकाळ विमानप्रवास म्हणजे कागदोपत्री काम आणि काही महत्वाच्या फाइल्स तपासण्याची संधी असते,” अशा कॅप्शनसहीत मोदींनी हा फोटो शेअर केलेला.

मोदींच्या या फोटोवर सात हजार ८०० हून अधिक कमेंट आल्या असल्या तरी या फोटोतील एका गोष्टीकडे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये मोदींच्या उजवीकडे ठेवण्यात आलेल्या एका बॅगला छोटं कुलूप लावलेलं आहे. सामान्यपणे ट्रेनने किंवा विमानाने प्रवास करताना सामान सुरक्षित रहावं म्हणून प्रवासी बॅगला कुलूप लावतात. मात्र जगातील सर्वोत्तम सुरक्षा असणाऱ्या नेत्यांमध्ये समावेश असणारे पंतप्रधान मोदीही आपल्या बॅगेला प्रवासादरम्यान कुलूप लावतात हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. काहींनी पंतप्रधानही एवढे मध्यमवर्गीय आहेत की त्यांनाही आपल्या सामानाला टाळं लावूनच प्रवास करावा लागतोय, असं म्हटलंय. अनेकांनी यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुन प्रतिक्रिया नोंदवल्यात.

बॅगेला टाळं लावलंय बघा…

मोदीसुद्धा मध्यमवर्गीय आहेत…

मोदींच्या या फोटोवर टीकाकारांनी त्यांना लक्ष्य केल्याचंही पहायला मिळत आहे. अनेकांनी हा फोटो दिखाऊपणा असल्याचं म्हटलं आहे. तर मोदी समर्थक आणि भाजपा समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी सदैव तत्पर असतात आणि काम करण्यासाठी मिळालेला कुठलाही वेळ ते वाया न घालवता सत्कारणी लावतात असं म्हणत मोदींचं कौतुक केल्याचं चित्र सोशल नेटवर्किंगवर दिसत आहे.