पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीमध्ये होणाऱ्या ऊर्जा गंगा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियामध्ये ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ट्विटरवर सध्या UrjaaGanga हॅश टॅग ट्रेंड करताना दिसतो आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटिझन्स ऊर्जा गंगा प्रकल्पाचे कौतुक करताना दिसत आहे. तर एका नेटिझन्सने या प्रकल्पाकडे मीडिया दुर्लक्ष करत असल्याची टीका देखील केली आहे. देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण असणाऱ्या प्रकल्पाकडे प्रसारमाध्यमे दुर्लक्ष करत असून चित्रपटाबाबत अधिक जागरुकता दाखवत असल्याची प्रतिक्रिया या ट्विर युजरने दिली आहे.
या योजनेमुळे बनारस मधील कोट्यवधी लोकांना फायदा होणार आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५० हजार घरांमध्ये पीएनजी मार्फत गॅस सुविधा पुरवली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १ लाख ५० हजार घरांपर्यंत ही योजना पोहोचविण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये ३३८ किमी, बिहार ४४१ किमी, झारखंड ५०० किमी तर ओडिसात ७१८ किमी पाईप लाईन बसविण्यात येणार आहे. या राज्यातील ७ शहरामध्ये हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे.

‘ऊर्जा गंगा’ उपक्रमामुळे ६ हजारांपेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. घरातील ऊर्जेसोबत वाहने आणि उद्योग क्षेत्रातील ऊर्जेची गरज पूर्ण करण्यास हा प्रकल्प सक्षम असेल. या उपक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे लाभ घेतल्यानंतर या सेवेची रक्कम अदा करण्याची सुविधा या योजनेत देण्यात आली आहे. वीज वापरानंतर जसे आपण बील भरणा करतो अगदी त्याच पद्धतीने जितका गॅसचा वापर करण्यात येईल तेवढे पैसे वापरकर्त्यांना मोजावे लागतील.