शुद्धलेखनामध्ये अवतरण चिन्हांना खूप महत्व असते हे अगदी शाळेपासून आपल्याला शिकवले जाते. एखाद्या वाक्यात अवतरण चिन्ह चुकले किंवा लिहायचे राहिले तर अर्थाचा अनर्थ होतो असेही अनेकदा शिक्षक सांगतात. त्यामुळेच लिहीताना नेहमी अवतरण चिन्हांची कळजी घ्यावी. पण हीच गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटमध्ये नसल्याने त्यांनी केलेल्या ट्विटचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे.

बुधवारी राज्यसभेमध्ये भाषण दिल्यानंतर मोदींच्या अकाऊंटवरून देशातील आरोग्य सेवा सुधारण्यासंदर्भात एक ट्विट करण्यात आले. मात्र या ट्विटमध्ये योग्य जागी स्वल्पविराम न टाकल्याने या वाक्याचा पूर्णपणे अर्थच बदलला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अकाऊण्टवरून (पीएमओ ऑफिस) ‘Let us work together in providing the poor quality and affordable healthcare: PM’ हे ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये गरीबांसाठी चांगल्या दर्जाचे आणि स्वस्तामध्ये आरोग्यसेवा उपलब्ध करुन देऊ असं पंतप्रधान म्हणाल्याचे सांगायचे होते. मात्र Poor या शब्दानंतर स्वल्पविराम न पडल्याने या शब्दाचा वाक्यातील गरीब हा अर्थ होण्याऐवजी वाईट हा अर्थ झाला आणि वाक्याचा पूर्ण संदर्भच बदलला. केवळ स्वल्पविराम नसल्याने वाईट प्रतीचे आणि स्वस्तातील आरोग्यसेवा पुरवण्यासाठी काम करु असे पंतप्रधान म्हणाले असा या वाक्याचा अर्थ होत आहे.

नेटकऱ्यांनी ग्रामर नाझी होत पीएमओ ऑफीसच्या या ट्विटची चांगलीच टर उडवली आहे. अनेकांनी हे ट्विट चुकीचे असल्याचे सांगितले आहे. तर काहींनी हे ट्विट डिलीट करण्याचा सल्लाही दिला आहे.

जाणून घ्या काय म्हणतायत नेटकरी…

> वाईट आरोग्य सेवा? यात आश्चर्यचकित होण्यासारखं काहीच नाही

> त्यासाठी काम करण्याची गरज नाही ते आधीपासूनच आहे

> ज्याने ट्विट केले त्याला कामावरून काढून टाका

> ट्विट डिलीट करा

> अवतरण चिन्हं राहिलंय भावा

> तिथे स्वल्पविराम येतो

> म्हणून शिक्षण महत्वाचे असते