मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलने मिशीसाठी चक्क आपल्या नोकरीवर पाणी सोडलं आहे. हो तुम्ही वाचलंत ते अगदी बरोबर आहे. म्हणजे एकीकडे सरकारी नोकरी मिळावी यासाठी तरुण धडपडत असताना दुसरीकडे या कॉन्स्टेबलने नोकरीच्या ऐवजी मिशीची निवड केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मिशी काढण्यास नकार दिल्याने त्याच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली. सहाय्य पोलीस महानिरीक्षकांनी त्याच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
कॉन्स्टेबल राकेश राणे भोपाळमधील पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत आहे. यावेळी त्याची मिशी लांब असल्याचं तसंच केसही कापले नसल्याचं लक्षात आलं. यावेळी त्याला मिशी आणि केस कापत शिस्त पाळण्यास सांगण्यात आलं. पण यानंतरही त्याने मिशी आणि केस कापले नाहीत. सहाय्यक पोलीस महानिरीक्षकांनी राकेश राणाला केस आणि मिशी कापण्याचा आदेश दिला होता.
महत्वाचं म्हणजे आदेश दिल्यानंतरही राकेश राणाने अशाच पद्धतीने केस आणि मिशी ठेवण्याचा हट्ट धरला. अंगावर वर्दी असताना अशा पद्दतीने लांब केस आणि स्टायलिश मिशी ठेवणं नियमाच्या विरोधात आहे. यामुळे इतर कर्मचाऱ्यांवरही चुकीचा प्रभाव पडतो. यानंतर राकेश राणावर कारवाई करत निलंबन करण्यात आलं आहे.