Police Inspector Stealing Cloth Video Viral : शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते; पण हेच समाजरक्षक समजले जाणारे हे पोलीसच कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करू लागले तर… पोलीस दलाची नाचक्की होईल असे वागू लागले तर… चोरी करू लागले तर… तुम्हाला हे वाचताना थोडं विचित्र वाटेल; पण अशाच स्वरूपाची एक सत्य घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका पोलिस अधिकाऱ्याने चक्क कपड्यांच्या दुकानात चोरी केली. त्याच्या चोरीचा हा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला, ज्यात हा पोलीस अधिकारी दुकानातून कपड्यांच्या बॅग चोरताना दिसतोय. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. चोरीच्या घटनेचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

नेमकं घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, भगतसिंग मार्केटमधील एका कपड्यांच्या दुकानात ही चोरीची घटना घडली. दुकानाच्या कॅश काउंटरजवळ सामानाने भरलेल्या चार बॅग्स ठेवल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतेय की, एक गणवेशधारी पोलीस अधिकारी दुकानाबाहेर उभा आहे. तिथे ठेवलेल्या बॅगवर तो लक्ष ठेवून आहे. दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे जाताच संधी पाहून तो एकेक करून चार बॅग्स उचलतो आणि काही सेकंदांनी तिथून निघून जातो. चोरी केल्यानंतर तो गुपचूप दुकानाबाहेरून पळ काढतो.

दरम्यान, दुकानातील कपड्यांच्या बॅग्स चोरी झाल्याचे लक्षात येताच दुकानदाराने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली. दुकानदाराने तातडीने पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संशयित पोलीस उपनिरीक्षक सुमित याला निलंबित केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ @KHURAPATT नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, दरम्यान अनेकजण या व्हिडीओवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले की, या पोलीसाला हरामाचे खाण्याची सवय लागली आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, हा पोलीस स्वतः चोर निघाला. तर तिसऱ्या एकाने लिहिले… हे रामराज्य आहे, रक्षक भक्षक बनले आहेत.