Police Officer Viral Video : कायद्यासमोर सगळे समान असतात असे म्हटले जाते. याच कायद्याचे रक्षण करण्याचे काम पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे असते. पण, कायद्याचे रक्षकच जेव्हा कायदेशीर नियम मोडतात तेव्हा मोठा प्रश्न निर्माण होतो की, न्याय मागायचा कोणाकडे? सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी वर्दीचा हा माज उतरणार तरी कधी, असा संतप्त सवाल केलाय. कारण एक पोलिस अधिकारी चष्म्याच्या दुकानात जातो, चष्मा खरेदी करतो, पण पैसे मागताच अशी काही मुजोरी करतो की दुकानदारही काही करू शकले नाही. ही संपूर्ण घटना दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे, ज्याचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होतोय.
पोलिस अधिकारी पैसे न देताच गेला निघून
व्हायरल सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहू शकता की, एक पोलिस अधिकारी एका चष्म्याच्या दुकानात प्रवेश करतो आणि दुकानदाराला चष्मा दाखवण्यास सांगतो. यावेळी दुकानदार त्याला अनेक चष्मे दाखवतो, पोलिस अधिकारी त्यातील आवडता चष्मा घेतो, नंतर दुकानदार त्याच्याकडे चष्म्याचे पैसे मागतो, पण हे ऐकून पोलिस अधिकारी संतापतो, तो दुकानदाराशी वाद घालू लागतो.
दुकानदार चष्म्याचे पैसे मागताच तो त्याला धमकावतो. दुकानदार त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण संतापलेला पोलिस अधिकारी पैसे न देताच चष्मा घेऊन दुकानातून निघून जातो.
दुकानदार बोलण्याचा प्रयत्न करतो, पण पोलिसाच्या वर्दीसमोर त्याचा आवाज दाबला जातो. ही घटना नेमकी कुठली आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण लोकसत्ता डॉट.कॉम अशा कोणत्याही व्हिडीओची पुष्टी करत नाही. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओंच्या आधारे ही माहिती दिली जात आहे.
पोलिस अधिकाऱ्याच्या मुजोरीचा हा व्हिडीओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी लिहिले की, हा वर्दीचा गैरवापर आहे, तर काहींनी म्हटले की अशा लोकांमुळे संपूर्ण पोलिस विभागाची बदनामी होते.
अनेक युजर्सनी असाही सवाल केला की, सामान्य दुकानदारांना आता त्यांचे पैसे मागण्याचा अधिकारदेखील नाही का?