Punjab Education Officer Viral Video: पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याला मंगळवारी निलंबित करण्यात आले. ऑफिसमध्ये पत्नीबरोबर डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंह बैन्स या विषयात लक्ष घालून कारवाईचे संकेत दिल्यानंतर शिक्षण विभागाच्या सचिव अनिंदिता मित्रा यांनी ही कारवाई केली.

सदर अधिकाऱ्याचे नाव देवी प्रसाद असून त्यांची नेमणूक बाघापुराना उपविभागात करण्यात आली होती. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, देवी प्रसाद यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांची बेशिस्त वागणूक दिसून येत आहे.

शिक्षण मंत्री बैन्स म्हणाले की, कोणत्याही अधिकाऱ्याने त्याचे कर्तव्य पार पाडले नाही किंवा नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोगा जिल्ह्याचे उपायुक्त सागर सेतिया यांनी तातडीने देवी प्रसाद यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. एका मिनिटांच्या व्हिडीओ क्लिपमध्ये शिक्षण अधिकारी आपल्या पत्नीबरोबर कार्यालयात काम करण्याऐवजी बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

मोगा जिल्ह्याच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद यांनी यंत्रणांना सांगितले की, सदर व्हिडीओ जुलै महिन्यातील आहे, जेव्हा ते निवडणुकीच्या ड्युटीवर होते. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी काही वेळ त्यांच्या कार्यालयात घालवला होता. यादरम्यान फक्त गम्मत म्हणून सदर व्हिडीओ चित्रीत केला होता.

देवी प्रसाद पुढे म्हणाले, त्यांची पत्नी एक युट्यूब चॅनेल चालवते. सदर व्हिडीओ त्यांच्या मुलांनी युट्यूबवर अपलोड केला होता. त्यानंतर तो सोशल मीडियावर पसरला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले, आम्ही देवी प्रसाद यांच्या लेखी उत्तराची वाट पाहत आहोत. बुधवारपर्यंत याचे उत्तर आम्हाला मिळायला हवे.