राणी एलिझाबेथ यांच्या दिमतीला शेकडो नोकर चाकर असतील, त्यांची एकही आज्ञा हे सेवक मोडू देत नाही. त्यांचा एक इशारा आणि त्या जे सांगतील ती वस्तू समोर हजर असते, तेव्हा राणींचा हा थाट वेगळा सांगायला नको. राणीच्या प्रवासासाठी तर जगभरातल्या आलिशान आणि महागड्या गाड्यांचा ताफा त्यांच्याजवळ असतो. या गाड्या चालवण्यासाठी राणीचे काही नेमून दिलेले चालकही असतात. तेव्हा राणी जिथे सांगेल तिथे त्यांना घेऊन जाण्यास ते २४ तास आपल्या सेवेत हजर असतात. पण रविवारी मात्र प्रजेला काही वेगळंच दिसलं. खुद्द राणीसाहेब आपली आलिशान गाडी चालवत चर्चमधून घरी परतत होत्या तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
राणी या दर रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जातात, अर्थात त्यांना चर्चमध्ये नेण्यासाठी गाडीचा चालक असतो पण रविवारी मात्र आपली हिरव्या रंगाची आलिशान जॅग्वार गाडी चालवत या ९१ वर्षीय राणी त्यांच्या घरी परतल्या, आतापर्यंत राजमहालाच्या कर्मचाऱ्यांच्या गर्दीत वावरणाऱ्या राणींना क्वचितच नागरिकांनी गाडी चालवताना पाहिलं असेल. तेव्हा या दुर्मिळ क्षणाचे छायाचित्र कॅमेरात कैद होऊन व्हायरल झाले नसेल तर नवल. पण कदाचित अनेकांना महिती नसेल की राणी एलिझाबेथ यांनी तरूणपणी लष्कराचे ट्रक चालवण्याचे काम केले होते. फक्त ट्रक चालवण्याचेच नाही तर तो दुरुस्त कसा करावा याचेही प्रशिक्षण त्यांनी घेतले होते. हे असे यापूर्वी कोणा राजघराण्यातील व्यक्तीने केले नव्हते. आणखी महत्त्वाची गोष्ट अशी की इंग्लडमध्ये कुठेही वाहन चालवण्यासाठी त्यांना वाहतूक परवान्याची आवश्यकता नाही. तेव्हा विनापरवाना गाडी चालवू शकणाऱ्या त्या इंग्लडमधल्या एकमेव व्यक्ती आहेत.