एव्हाना सोशल मीडियावर सक्रीय असणा-या नेटीझन्सना श्माय रंगीला माहिती झाला असलेच. हा श्याम तोच तरुण आहे ज्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाजाची अगदी हुबेहुब नक्कल करत सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. नोटांबदीच्या निर्णयानंतर व्हायरल झालेल्या सोनम गुप्ताचा विषय जर मोदींच्या कानावर गेला तर त्यांना काय वाटेल अशा स्वरुपाची मिमिक्री त्याने केली होती आणि रातोरात हा श्याम रंगीला प्रसिद्ध झाला होता. दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर श्याम रंगीला खळखळून हसवायला पुन्हा आला आहे. एटीएमबाहेर पैसे काढायला सामान्य नागरिकांना तासन् तास रांग लावावी लागते. असाच प्रसंग जर राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, लालू प्रसाद यादव, रामदेव बाबा, परेश रावल, सुनील शेट्टी यांच्यावर आलाच तर काय होईल अशा स्वरूपाचा हा व्हिडिओ आहे.

वाचा : कॅमेरूनच्या मंत्र्यांनी राष्ट्रपतींना केलेला ‘मुजरा’ सोशल मीडियावर व्हायरल

नोटाबंदीचा निर्णय आणि त्यानंतर सुरू झालेल्या सोनम गुप्ताच्या बेवफाईचे चर्चे जेव्हा मोदींच्या कानावर जातात तेव्हा ते कशाप्रकारे देशवासीयांना संबोधित करतील अशी मजेशीर मिमिक्री श्याम रंगीला या मिमिक्री आर्टिस्टने केली होती. तेव्हा त्याचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला होता. आता एटीएमच्या बाहेर रांग लावावी लागली तर मोदींचे विरोधक कशाप्रकारे मोदींना दुषणे देतील अशी नक्कल त्यांनी केली आहे. ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीला श्यामने ही नक्कल करून दाखवली. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, लालू प्रसाद यादव यांच्यावर जर हा प्रसंग आलाच तर ते मोदींना कसे बोल लावतील याची कल्पना करून श्यामने त्यांची नक्कल केली आहे. तेव्हा त्याचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा युट्युब आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता श्याम या सगळ्या राजकारण्यांच्या आवाजाची नक्कल कशी हुबेहुब वठवतो आहे यासाठी तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्की पाहावा लागेल. बघा तुम्हालाही आवडतोय का!

कोण आहे श्याम रंगीला?
२१ वर्षे वय असलेला श्याम शाळेत असल्यापासून अनेकांच्या आवाजाची नक्कल करत आहेत. राजस्थानमधल्या गंगानगर जिल्ह्यात एका छोट्याश्या खेड्यात त्याचा जन्म झाला. २००४ पासूनच शाळेच्या कार्यक्रमात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांच्या नक्कला करत त्यांनी प्रसिद्ध मिळवली. त्यानंतर गावागावात नक्कलाचे छोटे मोठे कार्यक्रम करत त्याने नाव कमावले. गेल्यावर्षी देखील त्यांनी मोदींची नक्कल केली होती. त्यामुळे त्याला अनेकजण ‘राजस्थानचा नमो’ या नावानेच ओळखतात. मोदी जर पाणीपुरी खात असतील तर ते कसे बोलतील असा तो व्हिडिओ होता. श्यामचे अनेक बॉलीवूड कलाकारांच्या आवाजातले व्हिडिओ फेसबुक, युट्यबवर आहेत. शाहारूख खान, परेश रावल, सुनील शेट्टी अशा अनेक बॉलीवूड कलाकारांच्या आवाजाची नक्कल तो करतो. त्याला कॉमेडिअन व्हायचे आहे. मोदींच्या दोन तीन भाषणांना त्यांनी उपस्थिती लावली होती. तेव्हापासूनच मोदींच्या आवाजांची नक्कल करण्याचा ध्यास त्याने घेतला.