Bhiwandi Rain Spider Man Video : मुंबईसह उपनगरात सध्या मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय, गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने आज चांगलाच जोर पकडला आहे, ज्यामुळे मुंबईतील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचलयं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. यात भिवंडी शहरातही सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय, येथील भाजी मार्केट तीन बत्ती नाका परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलयं, यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दुकानदारांचे नुकसान झाले आहे. याचदरम्यान भिवंडीतील रस्त्यावर एक भलतंच दृश्य पाहायला मिळालं. भिवंडीतील मुख्य बाजारपेठेत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चक्क स्पायडरमॅन रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले, ज्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावासाचा जोर पाहायला मिळतोय. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले, रस्त्यांना अक्षरश: नद्याचे स्वरूप आलेय, त्यामुळे चालकांना त्यातून वाहन काढताना अडचणी येतायत. अशा परिस्थितीत स्पायडर मॅनच्या वेशात एक व्यक्ती चक्क रस्त्यावर उतरून पाण्याचा निचरा करताना दिसतेय.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, मुसळधार पाऊस सुरू आहे. यावेळी स्पायडर मॅनच्या वेशात एक व्यक्ती रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उतरून वेट मोपने पाणी ढकलताना दिसतोय, पाण्यात अडकलेली कचऱ्याची गोणी उचलून बाजूला फेकतोय. रस्त्यावरील हे दृश्य पाहून नागरिकही चकित झाले, कारण हे काम महानगरपालिका प्रशासनाने करणं गरजेचं होतं, पण त्यांनी ते न केल्याने त्याचा फटका लोकांना सहन करावा लागतोय.
हा व्हिडीओ world_marathi_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कमेंटमध्ये लोकही हसण्याची इमोजी शेअर करत आहेत.