भारतीय रिझर्व्ह बँकेकडून १०० रुपयांची नवी नोट लवकरच बाजारात आणली जाणार आहे. या नव्या नोटेचा फोटो नुकताच जारी करण्यात आला आहे. हलकासा जांभळा रंग या नोटेचा असणार आहे. यामध्ये गुजरातच्या ऐतिहासिक ‘रानी की वाव’ म्हणजेच राणीच्या विहिरीचे छायाचित्र आहे. या रानी की वाव बद्दल काही रंजक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

गुजरातमधली पाटण इथे ‘राणी की वाव’ आहे. वाव म्हणजे विहिर होय. गुजरातमधील ज्या भागात पाण्याचं दुर्भिक्ष आहे अशा ठिकाणी तत्कालीन राजांनी खूप खोल अशा विहिरी खोदून घेतल्या. अर्थात विहिरी खूप खोल असल्यानं पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्याही बांधल्या. त्यामुळे अशा विहिरींची रचना आपल्या इथल्या विहिरींपेक्षा खूपच वेगळी आहे. इसवीसनाच्या अकराव्या शतकात गुजरातमध्ये सोळंकी या बलाढय़ घराण्याचे राज्य होते. आजचे पाटण हे गाव त्याकाळी सोळंकी साम्राज्यांची राजधानी होती. सोळंकी घराण्यातील राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ त्याची पत्नी राणी उदयमती यांनी गावात शिल्पसमृद्ध विहिरीची निर्मिती केली.

या पाण्याच्या विहिरी शिल्पकलेचा उत्तम नमुना ठरला. राणी की वाव ही सात मजली खोल विहीर आहे. प्रत्येक पातळीवर अत्यंत सुडौल आणि भरपूर मूर्ती दगडात कोरलेल्या आहेत. विष्णूचे दशावतार आहेत, विष्णूच्या विविध मूर्ती आहेत, गणपती, शिव, चार हातांचा मारुती अशा असंख्य मूर्ती इथे पाहायला मिळतात. इतकंच नाही तर नृत्यांगना-अप्सरा यांच्याही देखण्या मूर्ती इथे आहेत. या विहिरीचं सौंदर्य प्रत्येकाचं डोळे दिपवून टाकणारं असंच आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विहिरींची निर्मिती राणीने केली म्हणूनच या विहिरी ‘राणी की वाव’ म्हणून ओळखल्या जातात. २०१४ साली या जागेला जागतिक वारशाचा दर्जा युनेस्कोनं दिला. २००१ पर्यंत पर्यटकांना खोल पर्यंत या विहिरीत जात येत होतं मात्र भुज भूकंपामुळे या विहिरीच्या काही भागाला धक्का बसला आहे त्यामुळे काही मजले हे बंद ठेवण्यात आले आहेत. ही विहिर ९०० वर्षे जुनी आहे.