पठाणकोट हल्ल्याचे आक्षेपार्ह प्रक्षेपण केल्याबद्दल ‘एनडीटीव्ही इंडिया’वर एक दिवसाची प्रक्षेपण बंदी घालण्यात आली आहे. बेजबाबदार प्रक्षेपणाबद्दल कायदेशीर कारवाईचा पर्याय उपलब्ध असताना आणि तसेच न्यायालयीन दखल घेण्याऐवजी प्रक्षेपणबंदी लादण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयाचा विरोध देखील केला जात आहे. ‘एनडीटीव्ही इंडिया’वरील बंदीचा विरोध दर्शविण्यासाठी रविश कुमार यांनी शुक्रवारी ‘सवाल ह सवाल’ या प्राइम टाईमच्या माध्यमातून सरकारच्या निर्णयाचा विरोध दर्शविला. या कार्यक्रमामध्ये सूत्र संचालन करणारे रविश कुमारने दोन मूक कलाकारांना चर्चेसाठी बोलविले होते. संपूर्ण कार्यक्रमात रविश कुमार सवाल करत होते. तर मूक कलाकार आपल्या मूक अभिनयाचे दर्शन देताना दिसले.

सुरुवातीला दिल्लीच्या प्रदुषणावर सवाल उपस्थित केल्यानंतर रविश कुमार याने वृत्तवाहिनीवरील बंदीवर सवाल उपस्थित केले. सवाल विचारल्यानंतरच उत्तर मिळत असते. तसेच सवाल हा निरिक्षणातून उत्पन्न होत असतो. त्यामुळे सवाल उपस्थित करणाऱ्याला नोटीस द्यायचे नसते. असा संवाद साधत रविशने सरकारच्या निर्णयावर विरोध दर्शविला.

पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अतिप्रमाणात वार्ताकन करून देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवल्याप्रकरणी ‘एनडीटीव्ही हिंदी’ या वृत्तवाहिनीला एक दिवस प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारतर्फे देण्यात आले आहेत. ९ नोव्हेंबर रोजी वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण दिवसभरासाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर वाहिनीच्या प्रत्येक स्तरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ (ईजीआय) या संपादकांच्या संघटनेने ‘एनडीटीव्ही इंडिया’वरील प्रक्षेपणावरील बंदीची तुलना आणीबाणीशी केली आहे.

‘एनडीटीव्ही इंडिया’वरील प्राइम टाईम शोनंतर नेटीझन्सकडून रविश कुमारवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. रविश कुमार खरी पत्रकारिता करत असल्याच्या प्रतिक्रिया काही नेटीझन्स नोंदवत आहेत. तर एका नेटीझन्सने पत्रकारितेला जिवंत ठेवल्याचे सांगत रविश कुमारचा कार्यक्रम पाहिल्यानंतर हुकूमशाहीच्या अविर्भावात असणाऱ्याला झोप येणार नसल्याची प्रतिक्रिया देखील दिली आहे.