रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष निता अंबानी यांनी भालाफेकपटू नीरज चोप्राला जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदक मिळाल्यानंतर शुभेच्छा दिल्या. याबाबत रिलायन्स फाऊंडेशनने फेसबूक व ट्विटरवर याबाबची पोस्ट केली. या पोस्टमध्ये निता अंबानी यांच्या शुभेच्छा लिहिलेल्या होत्या आणि त्यांचाच फोटो वापरला होता. यानंतर फेसबूकवर युजर्सने नीरज चोप्राचा फोटो न वापरता स्वतःचा फोटो वापरण्यासाठी निता अंबानी यांना जोरदार ट्रोल केलं.

या पोस्टमध्ये निता अंबानी यांचा शुभेच्छा संदेश देण्यात आला होता. त्यात म्हटलं होतं, “जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा २०२२ मध्ये नीरज चोप्राला रौप्य पदक मिळालं यासाठी त्याचं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.” हा शुभेच्छा संदेश पोस्ट करताना रिलायन्स फाऊंडेशनने म्हटलं, “नीरज चोप्रा सर्व खेळाडूंसाठी एक प्रोत्साहन आहे. या स्पर्धेत पदक पटकावणारा नीरज दुसरा भारतीय खेळाडू आहे. तसेच ऑलिम्पिक व जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे.”

रिलायन्स फाऊंडेशनच्या फेसबूक पोस्टवर अनेक युजर्सने निता अंबानी यांच्या फोटोवर आक्षेप घेतला. तसेच हा नीरज चोप्राचा फोटो आहे का असा सवाल केला. कुणी किमान नीरज चोप्राचा फोटो तरी वापरा असा सल्ला दिला, तर काहींनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत नीरज चोप्रा असा दिसतो माहिती नसल्याचंही म्हटलं.

युजर्स एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी नीरज चोप्राचा भालाफेक करतानाचा फोटो एडीट करून त्यात निता अंबानी यांचा चेहरा जोडला आणि नीरज चोप्राचं अभिनंदन असा चिमटा काढला.

हेही वाचा :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेसबूकवरील ट्रेलिंगनंतर पोस्ट डिलीट

रिलायन्स फाऊंडेशनच्या फेसबूक पोस्टवर निता अंबानींना ट्रोल करण्यात आल्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. मात्र, हीच पोस्ट ट्विटरवर अद्याप आहे. तेथेही सोशल मीडिया युजर्स नीरजला शुभेच्छा देताना स्वतःचा फोटो लावल्याबद्दल निता अंबानी यांच्यावर टीका करत आहेत.