ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असणारे भारतीय वंशाचे उमेदवार ऋषी सुनक यांनी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. इंटरनॅशन सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजेच इस्कॉन (ISKCON) मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमाला सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ति यांनी हजेरी लावली. भक्तिवेदांत मनोर मंदिरामधील कार्यक्रमाला सुनक आणि त्यांची पत्नी उपस्थित होते. ऋषी सुनक हे आयटी क्षेत्रातील प्रसिद्ध असणाऱ्या इन्फोसिस या कंपनीचे सहसंस्थापक असणाऱ्या एन.आर.नारायण मुर्ती यांचे जावई आहेत.

मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे फोटो सुनक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यापैकी एका फोटोमध्ये ऋषी आणि अक्षता हे पाया पडत असताना दिसत आहेत. दोघांच्याही गळ्यामध्ये हे राम लिहिलेली भगवी शाल आहे. तर अन्य एका फोटोमध्ये ऋषी सुनक हे मंदिरातील गुरुजींकडून हातामध्ये गंडा बांधून घेताना दिसत आहेत.

“आज मी आणि पत्नी अक्षता जन्माष्टमी साजरी करण्यासाठी गेलो होतो. हा एक लोकप्रिय हिंदू सण असून भगवान श्री कृष्णाच्या जन्मानिमित्त तो साजरा केला जातो,” अशी कॅप्शन सुनक यांनी या फोटोंना दिली आहे.

ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर (काँझव्‍‌र्हेटिव्ह) पक्षसदस्यांमध्ये करण्यात आलेल्या ताज्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष काही दिवसांपूर्वीच हाती आले आहेत. त्यानुसार परराष्ट्रमंत्री लिझ ट्रस यांनी सुनक यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये मागे टाकल्याचं चित्र दिसत आहे. काँझव्‍‌र्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांनी पक्षनेतृत्वपदासाठी एका सर्वेक्षणामध्ये मतदान केलं आहे. याच मतदानामधून पक्षनेतृत्वापदी निवड झालेली व्यक्ती विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची उत्तराधिकारी असेल.

‘द टाइम्स’साठी ‘यूगोव्ह’ या प्रख्यात विश्लेषक संस्थेने पाच दिवस सर्वेक्षण केले. त्याच्या निष्कर्षांनुसार ट्रुस या सुनक यांच्यापेक्षा जवळपास ३८ टक्क्यांनी आघाडीवर आहेत. विद्यमान परराष्ट्रमंत्री ट्रुस यांना सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६९ टक्के पक्षसदस्यांनी पाठिंबा दिला, तर ३१ टक्के पक्षसदस्य सुनक यांच्या बाजूने आहेत. २० जुलै रोजी ‘यूगोव्ह’ने केलेल्या सर्वेक्षणात ट्रुस यांना ६२ टक्के समर्थन मिळाले होते, तर ३८ टक्के पक्षसदस्य सुनक यांच्या बाजूने होते.

‘यूगोव्ह’ने स्पष्ट केले, की पंतप्रधानपदासाठीच्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात काँझव्‍‌र्हेटिव्ह पक्षाचे २१ टक्के सदस्य कसे आणि कोणाला मतदान करायचे हे ठरवू शकले नाहीत. हा आकडा आता १३ टक्क्यांवर आला असून, याचा सर्वाधिक फायदा ट्रुस यांना होताना दिसत आहे.  ट्रस यांचे समर्थन करणाऱ्या ८३ टक्के सदस्यांनी सांगितले, की ते आपल्या समर्थनावर ठाम आहेत. १७ टक्क्यांनी आपले मत बदलू शकेल, असे सांगितले.

‘द टाइम्स’च्या वृत्तानुसार काँझव्‍‌र्हेटिव्ह पक्षाच्या ६० टक्के सदस्यांनी ट्रुस यांना मतदान करणार असल्याचे सांगितले. तर २६ टक्के सदस्यांनी सुनक यांना पाठिंबा दिला. बाकीच्यांचा पाठिंबा अद्याप निश्चित व्हायचा आहे. सर्व वयोगटांत आणि देशाच्या विविध भागांत ट्रुस सुनक यांच्या पुढे असल्याचे सर्वेक्षण दर्शवते. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनक यांना फक्त एकाच श्रेणीत ट्रुस यांच्यावर आघाडी मिळाली आहे. ही श्रेणी २०१६ मध्ये ब्रिटनच्या युरोपीय संघात (युरोपीयन युनियन) राहण्यास पाठिंबा देणाऱ्या पक्ष सदस्यांची आहे. मात्र, विरोधाभास हा आहे, की सुनक यांनी ‘ब्रेक्झिट’चे (युरोपियन युनियनमधून बाहेर पडणे) समर्थन केले होते. तर ट्रुस यांनी युरोपीय संघात राहण्यास पाठिंबा दिला होता.