नाताळ सण अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. या सणात ठिकठिकाणी ख्रिसमस ट्री उभारला जातो. उंचच उंच आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सजवलेले ख्रिसमस ट्री हे सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय असतो. अनेक देशांत शहराच्या मध्यभागी किंवा मोक्याच्या ठिकाणी खास कित्येक फूट उंच ख्रिसमस ट्री उभारण्याची प्रथा आहे. याला रोम तरी कसा अपवाद ठरेल. दोन आठवड्यापूर्वी खास ख्रिसमससाठी रोममध्ये मोठाला ख्रिसमस ट्री मागवण्यात आला होता. शोभेच्या वस्तूंनी सजवून झाल्यानंतर हा ख्रिसमस ट्री इथल्या शासकीय इमारतीसमोर मोठ्या दिमाखात उभा होता. पण,  ख्रिसमस येण्याआधी हा उंच वृक्ष मृत पावला आहे.

Viral Video : मुंबईच्या किनारी डॉल्फिन्स? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

पाळीव श्वानांनी घेतला मालकिणीचा जीव

नाताळाच्या आधी जवळपास ३८ लाख रुपये खर्चून हा ट्री येथे आणण्यात आला होता. ७०० किलोमीटर अंतर पार करून हा ६५ फूटांचा वृक्ष इथे आणला होता. त्यानंतर पारंपरिक पद्धतीनं तो सजवण्यातही आला होता. हा भलामोठा  ख्रिसमस ट्री पर्यटकांना आकर्षित करेन, असं सरकारला वाटत होतं. पण, नाताळसणाला अवघा एक आठवडा उरला असताना हा ट्री मृत पावला आहे. या झाडावर असणारी पानं गळाली असून, रया गेलेला ट्री इथून लवकरात लवकर हटवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी या ख्रिसमस ट्रीवर टिका केल्यानंतर रोमच्या मेयरने देखील आता या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.