Fan Suddenly Fell On Student in school Video Viral: लहानपणी शाळेत असताना आपण वर्गातील छताकडे बघून विचार करायचो की, फिरता पंखा अचानक खाली पडला तर काय होईल? हा विचार करत असताना अनेक प्रकारचे वाईट विचारही मनात येऊन जायचे. पण, आपण लहानपणी विचार करत असलेली ही घटना एका शाळेत खरोखरच घडली आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या एका वर्गात शिक्षिका शिकवत होती. यावेळी अचानक छतावरील पंखा खाली कोसळला आणि त्यानंतर जे काही घडले ते फारच भयानक होते. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ वर्गात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वर्गात अचानक पडला फिरता पंखा (Ceiling Fan Falls On Girl In MP School Video Viral)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधील ही घटना मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील एका खासगी शाळेतील आहे. ११ जुलै रोजी इयत्ता तिसरीमधील विद्यार्थिनाच्या अंगावर छतावरील फिरता पंखा कोसळला. यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली, या घटनेत तिचा हात फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या वर्गात एक महिला शिक्षिका मुलांना शिकवत आहे. याचवेळी अचानक वर्गाच्या छतावरील फिरता पंखा खाली कोसळतो, जो थेट एका विद्यार्थिनीच्या अंगावर पडतो. यानंतर ती रडायला लागते. पंखा खाली पडताच शिक्षिका खूप घाबरते, पण तात्काळ त्या विद्यार्थिनीच्या दिशेने धाव घेते. यावेळी विद्यार्थिनीच्या हाताला जखम पाहून ती शिक्षिका शाळेतील इतर कर्मचाऱ्यांना बोलावण्यासाठी धावते. पंखा पडताच संपूर्ण वर्गातील मुलांमध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी लगेच सहकारी शिक्षक आणि इतर कर्मचारी मदतीसाठी धावत येत विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातात.

या व्हिडीओबाबत समोर आलेल्या माहितीमध्ये ही घटना सिहोरच्या आष्टा येथील कन्नौड रोडवर असलेल्या पुष्पा उच्च माध्यमिक विद्यालयात घडल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेतील तिसरीच्या वर्गात पंख्याचा नट तुटून विद्यार्थिनीच्या अंगावर पंखा खाली पडला. यावेळी पंख्याचे ब्लेड एका आठ वर्षांच्या विद्यार्थिनीच्या कान आणि हाताला लागले. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. यावेळी तिला तात्काळ सेमिनरी रोडवरील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथून डॉक्टरांनी तिला प्राथमिक उपचारानंतर भोपाळमधील रुग्णालयात पाठवले.

आठ वर्षांची मुलगी झाली जखमी

प्रतिष्ठा मेवाडा असे या मुलीचे नाव असून ती लॉरस कलान या गावातील रहिवासी आहे. मुलगी रोजच्याप्रमाणे तिच्या शाळेत आली होती. वर्गात एकूण ४० विद्यार्थी शिकत होते. शिक्षिका सुमिता तिर्की त्यांना शिकवत होत्या. यावेळी सकाळी ९.४५ च्या सुमारास अचानक छताच्या पंख्याचा नट तुटला आणि पंखा प्रतिष्ठाच्या डोक्याजवळून जात खाली पडला. पंखा पडल्याने मुलीच्या कानाच्या एका बाजूला पंखा घासला गेला, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि तिच्या कानातूनही रक्त येऊ लागले. याशिवाय तिच्या हातालाही गंभीर दुखापत झाली आहे.

शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली घटनेची दखल

घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाचे आष्टाचे बीईओ अजबसिंग राजपूत, बीआरसीसी तरुण बैरागी कर्मचाऱ्यांसह पुष्पा उच्च माध्यमिक विद्यालयात पोहोचले. शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेही पाहिले. मात्र, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळा व्यवस्थापनाचा एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दिसला नाही. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते जखमी विद्यार्थीनीला घेऊन भोपाळला गेल्याचे समोर आले.

काय म्हणाले शाळेचे मुख्याध्यापक?

या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक फादर मेलविन सीजे यांनी सांगितले की, इयत्ता तिसरीच्या खोलीत लावलेला पंखा अचानक तुटल्याने जमिनीवर पडला. याच पंख्याच्या ब्लेडने विद्यार्थिनीला दुखापत झाली. तिच्यावर भोपाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.