देशाच्या सुरक्षेसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या जवानांना दिवाळी संदेश देण्यासाठी मोदी सरकारने नवा उपक्रम सुरु केला आहे. देशभरात दिवाळीच्या उत्सवात देखील जवान सीमेवर आपले कर्तव्य बजावत असतात.त्यांच्यामुळे प्रत्येक भारतवासियाने सीमेवरील जवानांना शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले होते. भारतीय जवानांना संदेश पाठविण्यासाठी ‘माझे सरकार’ या पोर्टलच्या माध्यमातून #Sandesh2Soldiers हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. भारतीय जवानांना संदेश देण्यासाठी सुरु केलेल्या या उपक्रमाला देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. मोदी सरकारच्या या उपक्रमाला नेटीझन्स मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देताना दिसत आहे. #Sandesh2Soldiers या हॅश टॅगच्या माध्यमांतून भारतवासियांना सीमेवरील सैनिकांना संदेश देत आहेत. मोदी सरकारने आपले सरकार या पोर्टलवर अॅपच्या माध्यमातून हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला भारततीयांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सामान्य जनतेपासून ते प्रसिद्ध व्यक्तिपर्यंत सर्वजण यंदाच्या दिवाळीमध्ये भारतीय सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त झाले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम केला असून नागरिकांना पंतप्रधान मोदींच्या या उपक्रमात सहभागी होऊन भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचे आवाहन केले.भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ याने सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्याने शहिद जवानांसाठी प्रत्येकाने दिप प्रज्वलीत करावा असे आवाहन केले आहे. भारतीय क्रिडा जगतातून मोहम्मद कैफ व्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी भारतीय सैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते भारतीय संघाचे आणि सीमेवर लढत असणाऱ्या सैनिकाचे कौतुक केले. तिरंग्याच्या सन्मानासाठी मैदानात विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाचा आणि सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.