सध्या सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ अल सौद यांच्या नावाची खुपच चर्चा आहे. गेल्या पंन्नास वर्षात सौदी राजांनी इंडोनेशियाकडे पाठच फिरवली होती, आता पंन्नास वर्षानंतर पहिल्यांदाच कोणी सौदी राजा मुस्लिम बहुल देशात प्रवेश करणार तर त्याची चर्चा होणारच, पण या चर्चेचे वेगळे कारण असेही होते की फक्त नऊ दिवसांच्या दौ-यासाठी राजांने ५०० टन सामान सोबत घेतले आहे याबरोबरच  दिमतीला शेकडो नोकरांचा ताफा घ्यायलाही ते विसरले नाही.

वाचा : अबुधाबीच्या युवराजांचं आलिशान विमान!

सलमान बिन अब्दुल अझीझ अल सौद हे अखेर इंडोनेशियात दाखल झाले, पण त्यांच्यापेक्षा त्यांच्या राजेशाही थाटाची चर्चा अधिक रंगत आहे. आपल्या नऊ दिवसांच्या दौ-यासाठी त्याने ५०० टन सामान सोबत घेतले. यात त्यांच्या आलिशान गाड्यांचा आणि एस्केलेटरचाही समावेश आहे बरं का! यासाठी राजाने वेगळे कार्गो विमानच बुक केले होते. इंडोनेशियन वृत्तपत्राच्या माहितीनुसार या सामानाची काळजीच घ्यायला ५०० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यांसोबत त्यांचे दहा मंत्री आणि २५ राजपुत्र  इंडोनेशियाच्या दौ-यावर आले आहेत. त्यामुळे आपली आणि राजपुत्राची सेवा करण्यासाठी राजाने १ हजार नोकर सोबत आणले असल्याचीही चर्चा आहे. कहर म्हणजे राजाला संरक्षण देण्यासाठी ९ हजार सैनिक देखील तैनात करण्यात आल्याचे वृत्त अनेक इंडोनेशियन वृत्तपत्रांनी दिले आहे. जकार्ताचा दौरा झाल्यानंतर राजे दोन दिवस बालीत सुट्टी व्यतित करण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे त्यांचे अर्धे सामान बालीमध्ये पाठवण्यात आले आहे.

वाचा : मुलीला परत मिळवण्यासाठी डच आईचे स्वराज यांना साकडे

राजाच्या भोजनासाठी देखील १५० शेफची नियुक्ती करण्यात आली आहे, तर इंडोनेशियाच्या ज्या ज्या मशीदींना ते भेट देणार आहे तिथे आलिशान शौचालय देखील बनवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. २०१५ मध्ये या राजाने वॉशिंग्टनला भेट दिली होती. तेव्हा २२२ खोल्यांचं आलिशन हॉटेलच त्यांनी बुक केलं होतं.