जगभरातील १८० हून अधिक देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच अनेक देशांमध्ये नैसर्गिक आपत्तीही ओढावल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील काही देशांमध्ये पूर आला आहे, भारताला मागील महिन्याभरात दोनदा वादळाचा तडाखा बसला आहे. पाकिस्तानमध्ये टोळधाडी पडल्या आहेत. हे कमी म्हणून की काय आता नॉर्वेमध्ये भूस्खलन झाले आहे.

३ जून रोजी नॉर्वेच्या समुद्रकिनाऱ्यांवरील मोठ्या आकाराचा भूभाग समुद्रामध्ये वाहून गेला. या नैसर्गिक आपत्तीचे भीषण रुप कॅमेरामध्ये कैद झालं आहे. किती मोठ्या प्रमाणात हे भूस्खलन झाले आहे याचा अंदाज व्हिडिओ पाहूनच येत आहे. मोठ्या मोठ्या आकाराचे भूभाग पाहता पाहता समुद्रामध्ये वाहून गेल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. अनेक घरांच्या पायाशी असलेली माती वाहून गेल्याने संपूर्ण घरच कोलमडल्याचेही अनेक व्हिडिओमध्ये दिसत आहे. अशाच व्हायरल झालेल्या व्हिडिओंपैकी अ‍ॅल्ट प्रदेशातील एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

अ‍ॅल्टमध्ये राहणाऱ्या यान एगिल बक्केबी यांनी हा व्हिडिओ शूट केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी हा व्हिडिओ ट्विटवर पोस्ट केला असून दोन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये समुद्रकिनारी असणारी मोठी आठ घरं वाहून जाताना दिसत आहे. या घरांच्या पाया असणारा एक मोठा भूखंडच पाण्यामध्ये हळूहळू सरकू लागतो आणि पाहता पाहता तो मुख्य किनारपट्टीपासून वेगळा होऊन समुद्रात वाहून जाताना या व्हिडिओत दिसत आहे. जान फ्रेड्रिक ड्रॅब्लोस यांनी ट्विटवरुन शेअर केलेल्या या व्हिडिओला ४६ हजारहून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. “नॉर्वेमधील अ‍ॅल्टमध्ये काही वेळापूर्वी हा प्रकार घडला. चिखलाचा मोठा पूर काही घरांना समुद्रात वाहून घेऊन गेला,” अशी कॅप्शन या व्हिडिओला ड्रॅब्लोस यांनी दिली आहे.

भूस्खलनाची चाहूल लागताच वेळीच मदकार्य करणारी टीम पोहचल्याने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवीत नाही झालेली नसल्याचे फोर्ब्सने आपल्या वृ्त्तामध्ये म्हटलं आहे. अनेकांनी या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देत निर्सगाचे असे रुप पहिल्यांदाच बघत असल्याचे मत व्यक्त केलं आहे.