Principal and teachers suspended: आई-वडिलांनंतर मुलांचे पहिले गुरू असतात ते त्यांचे शिक्षक. मुलांवर जितका कुटुंबाचा प्रभाव असतो तितकाच शिक्षकांचाही असतो. मुलांना शाळेत मारणं किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा करणं हे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, काही शिक्षक हे नियम पाळताना दिसत नाहीत. असाच प्रकार लखनऊमधील एका सरकारी प्राथमिक शाळेत घडला आहे. या शाळेतील मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांना मुलांना मारहाण करणे, त्यांना शाळेतून हाकलून लावणे आणि त्यांच्या कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले.

याबाबत जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. लखनऊमधील बेरूअरवारी इथल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी मागील जुलैमध्ये सादर केलेल्या त्यांच्या अहवालानुसार, शिक्षण क्षेत्रातील बेरूअरवारी इथल्या प्राथमिक शाळेतल्या सहाय्यक शिक्षिका अनिता यादव आणि सुनीत सिंह यांनी व्हाईटनर वापरून अटेंडन्स रजिस्टरवर त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मुलांना शिकवण्याऐवजी मुख्याध्यापक कार्यालयात बसून त्या मोबाईल फोन वापरतात. अशा अनेक तक्रारी त्यांच्याबाबत येत होत्या.

सिंह यांनी सांगितले की, अनिता यादव आणि सुनीता सिंग या अनेकदा मुलांना मारहाण करत आणि शाळेतून हाकलून लावत. तशा तक्रारीही येत होत्या. तसंच मुख्याध्यापक ओंकार नाथ सिंग बाहेरच्या लोकांना शाळेत बोलावत आणि त्यांच्या फ्रीजमध्ये अल्कोहोलयुक्त पदार्थ ठेवत. जिल्हा मुलभूत शिक्षण अधिकारी सिंह यांच्या म्हणण्याप्रमाणे, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नागरा आणि बांसडीहच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने २२ जुलै रोजी याबाबतचा अहवाल सादर केला. त्यात मुख्याध्यापक आणि दोन शिक्षिका यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर या तिघांनाही निलंबित करण्यात आले.

दरम्यान, याबाबत अनेकदा तक्रार केल्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याने पालकांमध्येही संतप्त वातावरण आहे. शाळेसारख्या पवित्र जागी मुख्याध्यापक आणि शिक्षक असे कृत्य करत असल्याने यावर अनेक तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.