सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे काही दिवसांपासून तीव्र निदर्शनं सुरू आहेत. येथील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण या कायद्याच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झालेले आहेत. मात्र आता या आंदोलनामधील एका पोस्टवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ट्विटवर या पोस्टरची बरीच चर्चा असून अनेकांनी या पोस्टरला विरोध दर्शवला आहे.

काय आहे या पोस्टरमध्ये?

साबा नकवी या महिलेने ट्विटवर शाहीन बाग येथील आंदोलनाचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये दोन पोस्टर्स दिसत आहे. पहिल्या पोस्टरमध्ये बुरखा घातलेल्या महिला टिकली लावून उभ्या असल्याचे दाखवण्यात आलं आहे. तर त्या खाली असलेल्या पोस्टरमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये धार्मिक चिन्ह मानलं जाणारं स्वस्तिक तुटलेल्या अवस्थेत दाखवण्यात आलं आहे.

वादाचं कारण काय?

साबा यांनी हे ट्विट केल्यानंतर अनेकांनी हिंदू धर्मात पवित्र मानलं जाणारं स्वस्तिक तुटलेल्या अवस्थेत दाखवल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहीजणांनी हा हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी या विरोध सुधारित नागरिकत्व कायद्याला आहे की हिंदू धर्माला असा सवाल उपस्थित केला आहे.

ट्विटवर ट्रेण्ड

याच प्रकरणावरुन अनेकांनी ट्विट केले असून Swastik हा शब्द ट्विटर इंडियावर चौथ्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसला. काही तासांमध्ये साडेसात हजारहून अधिक जणांनी या विषयावर ट्विट केलं आहे.

काय आहे लोकाचं म्हणणं पाहुयात ट्विट

साबा यांच्या या ट्विटवरुन अनेकांनी आक्षेप नोंदवला असला तरी त्यांनी इतरही अनेक पोस्टर्स आपल्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केले आहे. शाहीन बाग येथे सुरु असणाऱ्या आंदोलनात दिसणाऱ्या पोस्टर्सचे अनेक फोटो त्यांनी शेअर केले आहेत. मात्र व्हायरल झालेल्या फोटोमध्ये हिंदू धर्माचा अपमान केला जात असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे.