पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर नेहमीच तोंडसुख घेत असतो. कधी संघाच्या गचाळ कामगिरीवरुन, संघाच्या निवडीवरुन, तर कधी खेळाडूंसोबत चुकीची वर्तणूक केल्यावरुन तो क्रिकेट मंडळावर निशाणा साधत असतो. आता त्याने पाकिस्तानी सुपर लीग अर्थात पीएसएलच्या नवीन अँथम साँगवर आणि हे गाणं बनवणाऱ्या व त्या गाण्याला परवानगी देणाऱ्या पीसीबीच्या अधिकाऱ्यांवर तुफान हल्लाबोल केलाय.

एका व्हिडिओद्वारे त्याने या नवीन गाण्याची खिल्ली तर उडवलीच आहे, शिवाय तुम्हाला लाज वाटत नाही का असं गाणं बनवताना अशा शब्दात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खरडपट्टी काढलीये. माझ्या मुलांनी तीन दिवसांपासून (गाणं ऐकल्यापासून) बोलणं सोडलंय, अशा शब्दांत शोएबने या गाण्याची जबरदस्त खिल्ली उडवली आहे. “असं गाणं बनवणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे, मला तर हे समजत नाही की या गाण्याला पीसीबीने परवानगी कशी दिली…मला सांगितलं असतं…मी चांगलं गाणं बनवलं असतं…गाणं इतकं घाण आहे की माझ्या मुलांनी ३ दिवसांपासून बोलणं सोडलंय. तुम्ही लहान मुलांना घाबरवलं. मी तुमच्यावर खूप नाराज आहे आणि तुमच्याविरोधात केस दाखल करणार आहे” अशा शब्दात रावळपिंडी एक्स्प्रेस नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोएबने  गाण्याची खिल्ली उडवलीये. तसेच, गाण्यात वापरलेला शब्द Groove चा काय अर्थ होतो हे तरी माहितीये का या शब्दाचा अर्थ नाली होतो, या शब्दाचा गाण्यात कसाकाय वापर करु शकतात, असा सवाल विचारत त्याने पीसीबीला धारेवर धरलं आहे.


पाकिस्तान सुपर लीगचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला होईल, तर 22 मार्च रोजी अंतिम सामना होणार आहे. करोना महामारीदरम्यान पहिल्यांदाच पाकिस्तानात प्रेक्षकांना ( २० टक्के) स्टेडियममध्ये जाऊन सामना बघण्याची परवानगी असणार आहे.