Crane Accident Viral Video: उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना कॅमेरात कैद झाली असून काही तासांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झालं असं की, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीत काही लोक क्रेनवर चढले होते. पण या अतिउत्साही मंडळींच्या वजनाने क्रेन चक्क उलटली आणि लोक क्रेनमधून खाली पडल्याचे समजतेय. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त राजपूत सभेचे काही अधिकारी व कार्यकर्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी कर्हाळ चौकात जमले होते, जिथे ही घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी अनेक जण क्रेनवर चढले, त्यामुळे क्रेनमध्ये एका बाजूला जास्त वजन झाले आणि क्रेन पुढे झुकली. परिणामी ज्या वाहनावर क्रेन उभी होती ते वाहन उलटले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर घटनास्थळी गोंधळ व पळापळ झाली पण सुदैवानी वेळीच जमाव दूर झाल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती जर वेळीच लोकांनी पळ काढला नसता तर या घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला असता.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, क्रेनवर बसलेले चार तरुण जमिनीवर पडून किरकोळ जखमी झाल्याचेही पाहायला मिळत आहे. मशिन दुरुस्त करून नंतर मनपा अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून नेली, तत्पूर्वी समारंभाच्या वेळी उपस्थित लोकांनी झुकलेल्या क्रेनला ढकलून पुन्हा मूळ स्थितीत आणण्यासाठी एकीचे बळ दाखवले व पुन्हा आनंदाने जल्लोष सुरू केला होता.

हे ही वाचा<<पैशांचा हव्यास! विद्यार्थ्याला नग्न करून मारहाण; प्रायव्हेट पार्टवर लाथा मारल्या, केस जाळताना Video केला अन्..

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मैनीपुरी येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी समाजवादी पक्षाच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर नोंदवली होती. एनडीटीव्हीने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यांनी त्यांची पत्नी आणि लोकसभा उमेदवार डिंपल यादव यांच्या समर्थनार्थ रोड शो केल्यानंतर ही घटना घडली. मैनपुरीचे पोलिस अधीक्षक विनोद कुमार यांनी सांगितले की, “रोड शोनंतर पक्षाचे काही कार्यकर्ते पुतळ्याजवळ आले आणि त्यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ पक्षाचा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न केला. आम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहत आहोत.”