Shocking Viral Video : घरातून सकाळी बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी सुखरूप घरी येईल की नाही याची हल्ली शाश्वती नाही, असे हल्ली अनेक जण म्हणताना आपण ऐकतो. पण, घरात असलेली व्यक्तीही सुरक्षित असतेच, असेही नाही. कारण- अनेकदा अचानक अशा काही घटना घडतात, ज्याचा आयुष्यात कधी कोणी विचारही केला नसतो. एका महिलेच्या बाबतीतही असेच काहीसे घडले; पण तिचे दैव बलवत्तर म्हणून ती थोडक्यात बचावली. या थरारक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एक महिला घरातील हॉलमध्ये सोफ्यावर बसून मोबाईल पाहण्यात मग्न आहे. याच वेळी अचानक तिथे बसलेल्या तिच्या पाळीव मांजरींना एक विचित्र धोका जाणवतो आणि त्या लगेच सावध होतात. त्यानंतर त्या जीव वाचवण्यासाठी पळू लागतात. काही सेकंदानंतर तिथे असे काही घडते की, जे पाहून तुम्हाला धक्का बसेल: पण मांजरींमुळे ती महिला मृत्यूच्या जबड्यात जाण्यापासून थोडक्यात बचावली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे,जी आता वेगाने व्हायरल होतेय.
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, एक चिनी महिला तिच्या घरातील हॉलच्या सोफ्यावर बसून मोबाईलवर काहीतरी पाहत बसलीय. तिच्याभोवती तीन पाळीव मांजरीदेखील आहेत, ज्या वेगवेगळ्या ठिकाणी बसल्या आहेत. यावेळी टीव्ही युनिटजवळ बसलेल्या एका मांजरीला काहीतरी विचित्र घडत असल्याचे दिसू लागते आणि ती सावध होते. त्याच वेळी त्या मांजरीबरोबरच्या इतर मांजरींनाही तो धोका जाणवतो आणि त्या तेथून पळू लागतात.
यावेळी मांजरींची अस्वस्थता पाहून, त्या महिलेचे लक्ष मोबाईलवरून हटते आणि तीही त्या ठिकाणाहून दूर जाते. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, त्याच क्षणी टीव्हीच्या मागील टाइल्स टीव्हीसह भराभर जमिनीवर पडतात. सुदैवाने ती महिला काही सेकंद आधी तिथून दूर गेली आणि त्यामुळे ती या मोठ्या अपघातातून बचावली.
या धक्कादायक घटनेच्या लाइव्ह सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर phoenixtv_news नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहून सर्वांनाच धक्का बसला. एका युजरने कमेंट केली की, मांजरींना आधीच धोका जाणवतो. दुसऱ्याने म्हटले की, पाळीव मांजरींनी त्यांच्या मालकिणीचा जीव वाचवला. तिसऱ्याने लिहिले की, फक्त मांजरीच नाही, तर सर्व प्राण्यांना धोक्याची पूर्वसूचना मिळते.