Engineer Earns Three Times More Than Doctor, Reddit Post: अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्राची तुलना करणाऱ्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठा वाद सुरू झाला आहे. एका तीस वर्षांच्या डॉक्टरने रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भारतातील सर्वात मानाचे आणि स्थिर करिअर पर्यायांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे वैद्यकीय क्षेत्र अभियांत्रिकी आणि कॉर्पोरेट नोकऱ्यांसारखेच आर्थिक बक्षीस देते का? असा प्रश्न या तरुण डॉक्टरने उपस्थित केला आहे.
टॉपर असलेल्या या डॉक्टरने त्याच्या वैद्यकीय करिअरची तुलना त्याच्या शाळेतील मित्राच्या अभियांत्रिकी करिअरशी केली आहे. जो शिक्षणात सरासरी होता आणि नंतर इंजिनिअर बनला. या डॉक्टरने लिहिले आहे की, इंजिनिअर मित्राचा करिअर प्रवास, उत्पन्न आणि जीवनशैली वयाच्या ३० व्या वर्षी खूप वेगळ्या टप्प्यावर पोहचली आहे आणि त्याने वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या त्यागांना आता महत्त्व आहे का यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
या पोस्टमध्ये दोन शालेय मित्रांच्या करिअरचे वर्णन केले आहे. एकाने त्याच्या राज्य बोर्ड परीक्षेत पहिल्या १०० मध्ये आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण निवडले, तर दुसऱ्याने बारावीत ६५% गुण मिळवून दुसऱ्या राज्यात व्यवस्थापन कोट्यातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या या डॉक्टरच्या मित्राने पदवी पूर्ण केल्यानंतर काही महिन्यांतच पैसे कमवायला सुरुवात केली, तर डॉक्टरला एमबीबीएस पूर्ण करण्यात, त्यानंतर इंटर्नशिप, पदव्युत्तर प्रवेश तयारी आणि निवासी शिक्षण घेण्यात अनेक वर्षे घालवावी लागली. डॉक्टर चांगले उत्पन्न कमवू लागला तोपर्यंत त्याच्या इंजिनिअर मित्राला अनेकवेळा पगारवाढ मिळाली होती.
या डॉक्टरने पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, इंजिनिअर मित्राला आडवड्यातून पाच दिवस काम, नियमित सुट्ट्या, कामाच्या ठिकाणी मनोरंजनाच्या सुविधा आणि साथीच्या रोगाच्या काळात घरून काम करण्याच्या संधी होत्या.
दरम्यान, डॉक्टरने रेसिडेन्सीदरम्यानचे वाढलेल्या कामाच्या तासांचे आणि त्यानंतर ग्रामीण भागातील बंधनकारक सेवेदरम्यानच्या अनुभवांचे वर्णन केले आहे. जिथे अनेकदा मर्यादित सुविधा असतात.
कोविड-१९ दरम्यान, इंजिनिअर मित्राला घरून काम करण्याची मुभा होती, तर डॉक्टरांना सरकारी बाँड अंतर्गत ग्रामीण भागात सेवा देणे बंधणकारक होते.
या डॉक्टरने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, जवळजवळ एक दशकानंतर त्याला पहिली योग्य नोकरी मिळाली आणि महिन्याला १ लाख रुपये पगार मिळू लागला, परंतु तोपर्यंत त्याच्या इंजिनिअर मित्राचा पगार २-२.५ लाख रुपयांपर्यंत पोहचला होता. पोस्टनुसार, सध्या, इंजिनिअर मित्र या डॉक्टरच्या उत्पन्नापेक्षा तिप्पट जास्त कमावतो.