Snake found in medical college OT: मुंबई असो वा दिल्ली किंवा इतर कुठलंही ठिकाण, प्राण्यांचा वावर कुठेही अडवला जाऊ शकत नाही. मुंबईतही बोरिवली, मुलुंड किंवा ठाणे परिसरात अनेकदा मोठाले साप किंवा बिबट्याचा वावर असल्याच्या घटना कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. असाच एक प्रकार एका मेडिकल कॉलेजमध्ये घडला.

७ फुटांचा काळा, लांबसडक साप चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये सापडला आहे. कॉलेजमधील एका सफाई कर्मचाऱ्याला हा साप दिसला. खात्री करण्यासाठी त्याने बॉक्स उचलताच ७ फूट लांबीचा साप त्याला दिसला. त्यानंतर तो ओरडून सैरावैरा पळू लागला. याबाबत माहिती मिळताच ओटीमधील कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली.

झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये हा साप आढळला आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑपरेशन थिएटरचे प्रमुख कनक श्रीवास्तव यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी सापाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले. सर्पमित्रालाही या सापाला पकडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. अखेर एक तासाच्या प्रयत्नानंतर सापाला पकडण्यात यश मिळाले. महत्त्वाचं म्हणजे हा साप जंगलात सोडून दिल्याच्या बातमीनेही कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, या घटनेनंतर कॉलेज प्रशासनाने ऑपरेशन थिएटर आणि आजूबाजूच्या परिसरात दक्षता ठेवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. मेडिकल कॉलेजमधील याच ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरच्या रात्री भीषण आग लागली होती आणि त्या घटनेत १८ लहान मुलांचा जळून आणि श्वास कोंडून मृत्यू झाला होता.

यानंतर मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन माहोर यांन सांगितले की, पावसाळ्यात रूग्णालयाच्या परिसरात साप आणि इतर प्राण्यांचा वावर असण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने धोकाही वाढतो. ऑपरेशन थिएटरमध्ये साप आढळल्याच्या घटनेनंतर खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत. तसंच अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.