सूडवृत्तीचं एक अत्यंत विचित्र प्रकरण आणि टोकाचं उदाहरण समोर आलं आहे. ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील एका दुर्गम गावातील एका ४५ वर्षीय आदिवासी माणसाने चक्क सापाला चावल्याची धक्कदायक घटना घडली आहे. दानगडी ब्लॉकमधील साळीजंगा पंचायत अंतर्गत येणाऱ्या गंभीरभतिपिया गावातील किशोर बद्रा हा बुधवारी रात्री आपल्या भात शेतातून काम करून घरी परतत होता. तेव्हा एका सापाने त्याच्या पायाचा चावा घेतला. म्हणून, त्याचा सूड घेण्याकरिता बद्राने चक्क त्या सापाला पकडलं आणि मारलं.

“रात्री मी पायी घरी परतत असताना माझ्या पायाला काहीतरी लागलं. मी माझा टॉर्च चालू केला आणि मला आढळलं की तो एक विषारी क्रेट साप आहे. त्याचा सूड घेण्यासाठी मी साप हातात घेतला आणि त्याला वारंवार चावलं आणि तो साप जागीच ठार झाला.” या घटनेनंतर तो मृत सापासह आपल्या गावी परत आला आणि आपल्या पत्नीला घडलेला हा प्रकार सांगितला आहे. थोड्याच वेळात गावात हे प्रकरण हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं. बद्राने आपल्या मित्रांना आणि सगळ्या गावाला आपण मारलेला साप दाखवला.

मला कोणताही त्रास जाणवला नाही!

तिथे उपस्थित काहींनी यावेळी बद्राला जवळच्या हॉस्पिटलला जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला. परंतु त्याने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्याऐवजी त्याच रात्री एका पारंपारिक उपचारकर्त्याकडे सल्ला घेण्यासाठी गेला. बद्रा म्हणाला कि, “जरी मी विषारी क्रेट साप चावला असला तरी मला कोणताही त्रास जाणवला नाही. मी गावाजवळ राहणाऱ्या पारंपारिक उपचार करणा-याकडे गेलो आणि आता व्यवस्थित बरा झालो आहे.”

सुडाचं टोक! ‘त्याने’ तर दाताने सापाचे तुकडे केले होते

तुम्हाला माहिती आहे का कि अशी आणखी काही विचित्र सुडाची प्रकरणं आहेत. ज्यात माणसाने सापाला चावलं आहे. यापूर्वी जुलै २०१९ मध्ये गुजरातच्या महिसागर जिल्ह्यात सापाच्या चाव्यामुळे एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. परंतु, त्यापूर्वी त्याने देखील त्या सापाला मारलं होतं. “पर्वत गाला बरिया हा मक्याच्या शेताजवळ उभा होता. जिथे शेतातून ट्रकमध्ये मका भरला जात होता. त्यातच एक साप होता. तेव्हा पर्वत तो साप आपल्या हातात पकडून उभा राहिला. त्यानंतर त्या सापाने त्याच्या हातावर आणि चेहऱ्यावर चवावा घेतला. पुढे, पर्वतनेही त्या सापाला मारलं.”

अशीच आणखी एक घटना उत्तर प्रदेशात देखील घडली. एका व्यक्तीने आपल्या दाताने सापाचे तुकडे केले. एटा येथील रहिवासी राज कुमारला नशेच्या अवस्थेत साप चावल्यानंतर रुग्णालयात पाठवण्यात आलं. कुमारचे वडील बाबू राम म्हणाले कि, “माझा मुलगा मद्यधुंद होता. आमच्या घरात एक साप घुसला आणि त्याला चावला. त्यानंतर त्याने आपल्या दाताने त्या सापाचे तुकडे केले”.