Thane Snake Rain Water Video : मुंबई, ठाण्यासह अनेक भागांत पावसाचा कहर पाहायला मिळतोय. सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधारेमुळे रस्ते जलमय झालेत. त्यात पुढील आणखी काही तास अशीच मुसळधार सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे, रेल्वे सेवेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना गरज असली, तरच घराबाहेर पडा, अशा सूचना दिल्या जात आहेत. अशात ठाणे शहरातील पावसाचा एक भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात रस्त्यावर साठलेल्या पाण्यात चक्क जिवंत साप रेंगाळताना दिसतायत, जो पाहून अनेकांनी ठाणेकरांना रस्त्यावरून चालताना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरू शकेल.
ठाण्यातही सध्या पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. त्यात ठाण्यातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेलेत. दरम्यान, ठाणे परिसरालगतच्या जंगलातून अनेक जिवंत साप पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर रस्त्यावर वाहत आलेत, जे साठलेल्या पाण्यातून रेंगाळत आता मानवी वस्तीत शिरतायत. व्हायरल व्हिडीओतही हेच दृश्य पाहायला मिळतेय.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ठाण्यातील डायघर गावातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय, अनेकांच्या घरांत पाणी शिरलंय. त्याच पाण्यातून काही जिवंत साप लोकांच्या घरांत शिरले आहेत. व्हिडीओतही एक साप जलप्रवाहाबरोबर सरपटत जाताना दिसतोय. दरम्यान, अनेक लोक, वाहनंही या रस्त्यावरून ये-जा करतायत. त्यामुळे सर्वांना रस्त्यावरून चालताना सावध राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत. कारण- विचार करा की, या पाण्यात लोक चालतायत आणि चुकून सापावर पाय पडला, तर काय होईल… नक्कीच साप चावणार. त्यामुळे लोकांनी पावसाच्या पाण्यातून चालताना काळजी घ्यावी.
ठाण्यातील हा व्हिडीओ b.town.life नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहून अनेकांनी भीती व्यक्त केली आहे. तर, अनेकांनी नागरिकांना पावसात काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.